औरंगाबाद: चितेगाव येथील राहत्या घराच्या पत्र्याच्या छतावर ठेवलेली तार काढत असताना शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू झाला.ही घटना रविवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली.
शिवाजी आसाराम खंडागळे (५५) आणि बद्री शिवाजी खंडागळे (२२,दोघे रा. चितेगाव, ता. औरंगाबाद)असे मृताची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत पिता-पुत्र हे चितेगांव येथे पत्र्याच्या घरात राहतात. त्यांनी पत्र्याच्या छतावर कंम्पाऊं ड करण्यासाठी वापरली जणारी तार ठेवली होती. या तारेची त्यांना आज गरज असल्याने शिवाजी पत्र्यावरील तार काढू लागले. त्यावेळी त्यांच्या छतावरील पत्र्यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना शॉक लागला.
त्यामुळे ते तडफड करू लागले. ही बाब बद्री यांना दिसली. वडिलांना काय झाले, हे पाहण्यासाठी तो त्यांच्याकडे धावला आणि त्याने त्यांना पकडले. यामुळे बद्रीलाही शॉक लागला. काही वेळात पिता-पुत्र बेशुद्ध पडले. या घटनेची माहिती कळताच शेजाºयांनी त्यांना तात्काळ औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी शिवाजी आणि बद्री यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.