औरंगाबाद : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाची जिल्हा, शहर कार्यकारिणी सोमवारी सायंकाळी अचानक बरखास्त करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील यांनी घेतला. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ८ जून रोजी दिल्लीगेटवर कार्यकर्त्यांनी केलेली हुल्लडबाजी आणि पोलिसांकडून होणारी अपेक्षित कारवाई लक्षात घेऊन हा मोठा निर्णय झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या नुपूर शर्मा, नवीन जिंदल यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती. दोषींवर गुन्हे नोंदवावेत कठोर शिक्षा करावी आदी मागण्यांसाठी शहर शाखेतर्फे शुक्रवार ८ जून रोजी दिल्लीगेटवर धरणे आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनास ४०० ते ५०० नागरिक, कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज होता. अचानक हजारोंचा जनसमुदाय दिल्लीगेटवर दाखल झाला. त्यामुळे पोलिसांनाच धडकी भरली. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना घटनास्थळ गाठून कायदा व सुव्यवस्था राखावी लागली. आंदोलनातील काही हुल्लडबाज तरुणांनी एक कार फोडली. पुढील मोठा अनर्थ टाळण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याने आंदोलन शांततेत पार पडले. पोलिसांनी केलल्या व्हिडिओ शुटींगमध्ये हुल्लडबाज कोण ? त्यांना उचकवणारे कोण? हे सर्व आले. आता कारवाईचा बडगा पोलीस उगारण्याच्या तयारीत आहेत. तत्पूर्वी खा. जलील यांनी शहर आणि जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून पुन्हा एकदा योग्य टाईमिंग साधले.
जलील यांचे ‘प्रेम’ पत्रजिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जलील यांनी नमूद केले की, पक्षाबद्दल आपली निष्ठा लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण पदावर आपली नियुक्ती केली होती. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण विविध आंदोलने केली. त्यामुळे पक्षाला मजबुती मिळाली. पुढील आदेशापर्यंत शहर, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काम करावे.