जयेश निरपळ
गंगापूर : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले असून, शिवसेना- भाजपने संमिश्र यश मिळविले. विशेष म्हणजे तालुक्याचे नेतृत्व करू पाहणाऱ्यांना यावेळी मतदारांनी नाकारल्याने प्रस्थापितांना हा एक प्रकारचा धक्का मानला जातो. या निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र निकालावरून दिसून येते.
औद्योगिक वसाहतीतील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेली शे. पु. रांजणगाव येथे आमदार बंब यांच्या समतोल विकास पॅनेलने १७ पैकी १४ जागेवर विजय मिळविला. सलग तिसऱ्यांदा ही ग्रामपंचायत बंब यांच्या ताब्यात आली. महाविकास आघाडीच्या एकता पॅनेलला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले. लासूर स्टेशन (सावंगी) ग्रामपंचायतीत बंब यांनीच यश मिळविले. या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढाई झाली होती. महाआघाडी, मनसे व वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन समतोल पॅनेल विरुद्ध प्रचार केला; परंतु पं. स. सभापती संपत छाजेड यांना सोबत घेऊन आमदारांनी लासूर स्टेशन ही बाजारपेठ देखील ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती संजय जैस्वाल यांचा बावीस वर्षीय मयूर जैस्वाल याने पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वाळूज व जोगेश्वरीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांना संधी दिली. भाजपचे शिवप्रसाद अग्रवाल व जि. प.चे माजी बांधकाम सभापती मनोज जैस्वाल यांचा पराभव झाला. त्यांच्या पत्नी मंजूषा जैस्वाल यांनी विजय मिळविला. जोगेश्वरीत राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख डॉ. नीळ यांच्या पॅनेलसहित त्यांच्या पत्नीलाही पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे योगेश दळवी विजयी झाले. येथे कोणत्याही पॅनेलला स्पष्ट बहुमत दिले नाही.
डोणगाव ग्रा.पं. निवडणुकीत कृष्णा पाटील, किरण पाटील व संभाजी पाटील यांचे स्वतंत्र पॅनेल होते. या ठिकाणी सत्ताधारी संभाजी पाटील यांच्या पॅनेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कृष्णा पाटील व किरण पाटील यांच्या पॅनेलला अनुक्रमे पाच व चार जागा मिळाल्या. आंबेओहळमध्ये दिलीप बनकर यांच्या पॅनेलने आमदार बंब पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. गाजगावमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनेलने ११ पैकी ०९ जागेवर यश मिळविले. मात्र येथे पॅनेल प्रमुख कडुबा हिवाळे यांचा पराभव झाला. जामगावला राष्ट्रवादीच्या माने गटाला आपली सत्ता गमवावी लागली. १५ पैकी ११ जागा जिंकत शिवशाही विकास पॅनेलने सत्तांतर घडवून आणले. मांजरीमध्ये शिवसेनेचे अंकुश सुंब यांच्या पॅनेलला अकरा पैकी एकही जागा मिळवता आली नाही. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला धवल यश मिळाले. वाहेगावमध्ये काँग्रेसचे विजय मनाळ यांचा पराभव झाला. नेवरगावमध्ये जि. प. सदस्य मधुकर वालतुरे यांच्या पॅनेलचा विजय झाला. त्यांच्या सुनेला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. एकंदरीत गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही.
-------------
भालगावमध्ये प्रथमच एमआयएम
भालगाव ग्रामपंचायतीमध्ये एमआयएम पक्षाचे पहिल्यांदाच पाच सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष सरपंच निवडीनंतरच अधिक चित्र स्पष्ट होईल.