छत्रपती संभाजीनगर : घरासमोर खेळणाऱ्या २ वर्षांच्या मुलाचा कचरा वेचणाऱ्या महिलेने उचलून घेत अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना विश्रांतीनगरमध्ये घडली. १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात भंगार विक्रेता शेख तयब (४४, रा. भारतनगर), कचरा वेचणाऱ्या ‘टकली’ नामक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
२२ वर्षीय तक्रारदार महिला पती, दोन वर्षांच्या मुलासह विश्रांतीनगरमध्ये राहते. १४ जानेवारी, रविवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास तिचा मुलगा घरासमोर खेळत होता. तेव्हा टकलीने त्याला अचानक उचलले. हा प्रकार शेजारच्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ बाळाच्या आईला हाका मारल्या. तेव्हा तिने धाव घेत टकलीला अडवले. मुलाला तत्काळ ताब्यात घेत टकलीला जाब विचारला. तेव्हा टकलीने भंगारवाल्याने हे बाळ उचलून घेऊन जाण्यास सांगितल्याचे सांगितले.
हा प्रकार समजताच परिसरात मोठी गर्दी जमा झाली. स्थानिकांनी तयबकडे धाव घेतली. तेव्हा तयबने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. तक्रारदार महिलेच्या पतीला तयबने मारहाण करून पोलिसांकडे तक्रार केल्यास पाय कापून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर दाम्पत्याने थेट पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक राजेश यादव यांच्या सूचनेवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांची चौकशी सुरू असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.