औरंगाबाद : मराठवाड्यातील जि.प., महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २,१६३ शाळांतील ४८.६७ टक्के विद्यार्थी अंकगणितात कच्चे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत डिसेंबरअखेरपर्यंत अध्ययनस्तर १०० टक्के करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगाबाद आणि लातूर विभागांतील शाळांच्या अध्ययनस्तराच्या प्रगतीचा आढावा प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथे घेतला. यावेळी विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त सूर्यकांत हजारे, अनंत कुंभार, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षण सहसंचालक एम.के. देशमुख, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे डॉ. सुभाष कांबळे, आठ जिल्ह्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, ७६ गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. भापकर यांनी डिसेंबर २०१८ पर्यंत १०० टक्के शाळा डिजिटल करणे, डिजिटल शाळांमधील प्रत्येक वर्ग डिजिटल करणे, शिक्षक तंत्रस्नेही करण्याचे ‘मिशन १०० डिजिटल मराठवाडा’ जाहीर केले. यासाठी शाळांना १४ व्या वित्त आयोग आणि लोकसहभागातून निधी उभारण्याचे आवाहन करण्यात आले. याच बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील अध्ययनस्तराची आकडेवारी समोर आली.
पहिली ते पाचवीच्या २,१६३ शाळांमध्ये १ लाख ५६ हजार ४४१ शिक्षण घेत आहेत. यातील ७७.३८ टक्के विद्यार्थ्यांना वाचनस्तर उत्कृष्ट आहे. मात्र, अवघ्या ५१.३३ टक्के विद्यार्थ्यांना अंकगणितात आकडेमोड करता येते. उर्वरित ४८.६७ टक्के विद्यार्थ्यांचे अंकगणित अतिशय कच्चे असल्याचेही समोर आले आहे. त्यांना साधा गुणाकार व भागाकारही येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांचा वाचनस्तर आणि अंकगणिताचे प्रमाण डिसेंबर अखेरपर्यंत १०० टक्क्यांवर पोहोचविण्याचे आदेश डॉ. भापकर यांनी उपस्थितांना दिले आहेत.
दीड महिन्यात स्तर कसा सुधारणार?विभागीय आयुक्तांनी आढावा घेत डिसेंबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील प्रत्येक शाळा, वर्ग डिजिटल करण्यासह तंत्रस्नेही शिक्षक बनविण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. मात्र, यासाठी लागणारा निधी शाळांना लोकसहभागातून उभा करण्यासही सांगितले आहे. यामुळे अवघ्या दीड महिन्यात १०० टक्के स्तर कसा सुधारणार? असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांना पडल्याचे सूत्रांनी सांगितले. याच आढावा बैठकीत डॉ. भापकर यांनी अधिकाऱ्यांना स्वलिखित माझा शालेय परिपाठ, भाऊ आणि दीदी, शैक्षणिक षटकार ही पुस्तके भेट दिली.