औरंगाबाद : मागील ५ महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागांतील २५ महिलांना त्यांच्या पतीने घरातून हाकलून दिले, तर अन्यायाला वाचा फोडल्याने १३० महिलांवर घरातच अत्याचार होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
कौटुंबिक हिंसाचार झालेल्या १३० महिलांच्या तक्रारीतून ही माहिती पुढे आली. अशा पीडित महिलांना सखी वन स्टॉप सेंटरने आधार दिला. तेव्हा ही आकडेवारी समोर आली. सासू-सुनेमधील भांडण काही नवीन नाही; पण त्यात पती मध्ये पडतो व आपल्या आईचा अपमान का केला म्हणून पत्नीला जबर मारहाण करतो, अशा ७० टक्के केसेस आहेत. मोबाईलवर कोणाशी बोलते यावर संशय घेऊन पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या ५ टक्के केसेस, तर ३ टक्के केसेसमध्ये माहेरचे विशेषत: आईची आपल्या मुलीच्या संसारात लुडबूड हे अत्याचाराचे कारण बनल्याचे दिसून आले. ४ ते ५ टक्के केसेस अशा आहेत की, त्यात पीडित महिलेची चूक असल्याचे समोर आले.
घरातून हाकलून दिलेल्या २५ महिलांना वन स्टॉप सेंटर येथेच तात्पुरती निवासाची व्यवस्था करून देण्यात आली. १८ महिलांना वैद्यकीय, तर ५२ महिलांना पोलीस विभागाची मदत, १४ महिलांना कायदेशीर मदत मिळवून देण्यात आली आहे. १३० पैकी १०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. २० महिला ज्याच्यासाठी सासरचे दरवाजे बंद होते त्या महिलांना तिच्या सासरच्यांनी पुन्हा घरात घेतले व आज आनंदात संसार करीत आहेत. हेच सखी वन स्टॉप सेंटरचे यश असल्याचे केंद्र संचालिका ममता मोरे यांनी सांगितले.
पीडित महिलेला मोफत मदतपीडित महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचारानंतर या विविध विभागांकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता त्या महिलेची उरलेली नसते. हे लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने कटकटगेट परिसरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रालगत सखी वन स्टॉप सेंटरला परवानगी दिली आहे. येथे पीडित महिलांना मोफत मदत केली जात आहे.