औरंगाबाद : घरगुती वादातून रागाच्या भरात ७१ वर्षीय मातेची तरुण मुलाने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री बाळापूर येथे घडली. आरडाओरड होताच घरी धावलेल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी मारेकरी मुलाला पकडून त्याचे हातपाय बांधून पोलिसांच्या हवाली केले.
शशिकला भिकाजी घुगे (रा. बाळापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रमेश भिकाजी घुगे (३०, रा. देवळाई रोड), असे मुलाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, मयत शशिकला या ८० वर्षीय वृद्ध पती आणि मुलांसह राहत होत्या. त्यांचा सर्वात लहान मुलगा रमेश हा वर्षभरापासून मनोरुग्णासारखा वागत आहे. तो देवळाई रोडवरील एका कॉलनीत पत्नी आणि मुलासह राहतो. त्याची पत्नी माहेरी गेल्यामुळे काही दिवसांपासून रमेश आई-वडिलांच्या घरी आला होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याचे भाऊ आणि अन्य नातेवाईक दूध विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास नातेवाईक गायी, म्हशीचे दूध काढण्यात मग्न होते.
रमेशचे घरगुती कारणावरून आई शशिकलासोबत भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आईवर कुऱ्हाडीने घाव घातले. शेजाऱ्यांना ही घटना निदर्शनास येताच आरडाओरड केली. यामुळे काही अंतरावरील त्यांची मुले, नातवंडे आणि सुना यांनी घरी धाव घेतली. रमेशला काहींनी पकडून ठेवले. तरीही त्याने हाताला झटका देऊन आईला दगड फेकून मारला. यानंतर त्याला पुन्हा पकडून दोरखंडाने जखडण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी गंभीर जखमी शशिकला यांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
आरोपी मानसिक रुग्ण ?सूत्राने सांगितले की, आरोपी रमेश हा वर्षभरापासून मानसिक रुग्ण झाला होता. तो खाजगी कंपनीत नोकरी करायचा. दरम्यान, त्याने वर्षभरापूर्वी एका मनोरुग्णालयात दोन महिने उपचार घेतले होते. मात्र, तो जन्मदात्रीचीच हत्या करील, असे गावातील कुणाला अथवा नातेवाईकांना वाटले नव्हते.