- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : महापालिकेत ९ फेब्रुवारी २०१९ रोजी कोणतीही सर्वसाधारण सभाच झाली नाही. या अदृष्य सभेचा आधार घेत शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तासिका तत्वावर १० शिक्षकांची नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभाग एवढ्यावरच थांबला नाही. आणखी १० ते १५ शिक्षक नेमण्याच्या वेगवान हालचाली सुरू आहेत.
महापालिकेत घोटाळा होणे नवीन नाही. कोरोनामुळे काही घोटाळे बाहेरच आले नाहीत. आता निर्बंध उठताच घोटाळ्यांना हळूहळू पाय फुटू लागले आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातील चलाख मंडळींनी न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त तयार केले. या इतिवृत्तातील एका ठरावाचा संदर्भ देत वेळोवेळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांची नेमणूक केली आहे. मुळात ९ फेब्रुवारी २०१९ रोजी शनिवार होता. शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला नव्हता. त्यामुळे शनिवारी मनपाची सर्वसाधारण सभा होऊ शकते. मात्र, या दिवशी अशी कोणतीही सर्वसाधारण सभा तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेली नाही. शिक्षण विभागाने ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सभा झाल्याची नोंद केली आहे. या सभेत शालेय व्यवस्थापन समितीला तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमण्याचे अधिकार दिल्याचे नोंदवून प्रथम १६ सप्टेंबर २०१९ रोजी चार शिक्षकांची नेमणूक केली. २७ ऑक्टोबर २०२० रोजी आणखी तीन, २२ डिसेंबर २०२० रोजी तीन शिक्षकांची नेमणूक केली. मागील काही दिवसांपासून पुन्हा दहा ते पंधरा शिक्षक नेमण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण सभेचा ठराव असल्याचा धाक दाखवून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या वेळोवेळी सह्या सुद्धा घेण्यात आल्या आहेत.
६ फेब्रुवारीला सभा झाली पण...महापालिकेत ६ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत विविध पक्षाच्या नगरसेवकांनी बालवाडी शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक कमी असल्याची ओरड चर्चेत केली होती. मात्र, महापौर, आयुक्त यांनी शिक्षक नेमावेत असे कोणतेही आदेश दिले नाहीत. उलट असा कोणताही ठराव घेतल्याचे इतिवृत्तात नोंद नाही.
मी रुजू होण्यापूर्वीचा विषयसेवा ज्येष्ठतेनुसार मला अलीकडेच प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून पदभार दिला आहे. मी रुजू होण्यापूर्वी या नेमणुका झालेल्या असतील. मी आतापर्यंत अशा पद्धतीची एकही नेमणूक केलेली नाही. सभा झालेली नसताना त्याचा संदर्भ देत शिक्षक नेमणे हे बरोबर नाही. तारखेत घोळ झालाय का? हे तपासून घेतो. वेळोवेळी वरिष्ठांची मान्यता घेतली का? हे सुद्धा तपासले जाईल.- रामनाथ चौरे, प्रभारी शिक्षणाधिकारी, मनपा.