औरंगाबाद : दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या मांजामुळे लष्करी जवानाचा (हवालदार) गळा कापला गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. मांजामुळे गळ्यावरील कातडी, त्यानंतर मांसल भाग आणि नंतर थेट श्वसननलिकेपर्यंत गळा चिरला गेला. लालचंद घुसिंगे (३६), असे जखमी जवानाचे नाव असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याविषयी मिळालेली माहिती अशी, लालचंद घुसिंगे हे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून छावणी परिसरातून जात होते. अचानक त्यांच्यासमोर पतंगाचा मांजा आला आणि काही कळण्याच्या आत त्यांचा गळा कापला गेला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घटनेनंतर उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. गळा चिरून श्वसननलिका कापली गेली होती. त्यामुळे तातडीने डॉक्टरांनी उपचार केले. कापल्या गेलेल्या गळ्याला टाके द्यावे लागले. अशा घटनेनंतर श्वसननलिकेला सूज येऊन प्रकृती गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे श्वासोच्छ्वासासाठी मानेजवळ छिद्र करून श्वासोच्छ्वास सुरळीत ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर ट्रामा केअरमध्ये उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली.
या घटनेनंतर जखमी घुसिंगे यांची विचारपूस करण्यासाठी घाटीमध्ये लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांनी धाव घेतली. शहरात बुधवारी अनेक रस्त्यांवर कटलेल्या पतंगाच्या मागे मुले पळतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यासोबत दुचाकीवरून जाताना अचानक मांजा आल्यामुळे दुचाकी थांबवून मांजातून स्वत:ची सुटका करून घेणारे चालकही दिसून आले. विशेषत: जालना रोडवर हा प्रकार अधिक दिसून आला. नायलॉनचा मांजा?नायलॉनचा मांजा हा नायलॉनच्या धाग्यापासून तयार करण्यात येतो. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत केला जातो. या प्रकारच्या मांजामुळे गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात. या घटनेत नेमका कोणत्या प्रकारचा मांजा होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, नायलॉनचा मांजा असण्याची शक्यताच वर्तविण्यात येत आहे.
गळ्याचे ३ भाग चिरलेलालचंद यांच्या गळ्याचे तीन भाग कापल्या गेले. श्वसननलिका कापल्या गेली होती. त्यामुळे टाके द्यावे लागले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मांजा नेमका कोणत्या प्रकारचा होता, याविषयी काही कळू शकले नाही.- डॉ. वसंत पवार, सहयोगी प्राध्यापक, कान-नाक, घसा विभाग, घाटी
मांजामुळे चिरला महिलेचा गळा, १५ टाकेदुचाकीवरून जाणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेचा मांजामुळे गळा चिरल्याची घटना सुंदरवाडी परिसरात घडली. निशा नीलेश काळे असे या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तब्बल १५ टाके द्यावे लागले. निशा काळे या सुंदरवाडी येथे राहतात. मुलाला शाळेतून घरी सोडून रुग्णालयात दाखल आजारी मुलीकडे त्या दुचाकीवरून जात होत्या. तेव्हा अचानक त्यांच्या गळ्यात मांजा अडकला आणि काही लक्षात येण्यापूर्वीच गळा कापला गेला. या घटनेनंतरही त्या दुचाकी चालवीत होत्या. मात्र, काही वेळातच झालेली जखम त्यांच्या लक्षात आली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्याभोवती टाके देण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नायलॉन मांजावर बंदी असूनही शहरात सर्रास या मांजाचा वापर होत आहे. त्याचाच फटका या महिलेला बसल्याची माहिती सूत्रांनी दिली