औरंगाबाद: भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी बनावट जन्म तारिखेचा दाखल सादर करणाऱ्या ६ तरुणांचा बनाव सैन्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी सैन्य दलातर्फे या तरुणांविरुध्द रविवारी फसवणूकचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही फसवणूक २०१६ ते २०२० या कालावधीत झाली.
विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने,सिक्री), किरण कौतिकराव भाडगे (रा. वाकड) आणि अनिस अलाउद्दीन शेख (रा. माळी गल्ली,परभणी) अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दरवर्षी सैन्य भरती कार्यालयाकडून सैन्य भरतीचे आयोजन केले जाते. देशसेवा आणि शासकीय नोकरी मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणून लाखो तरुण सैन्यात दाखल होण्यासाठी प्रयत्न करतात. सैन्य दलात भरती होण्यासाठी वयाची अट आहे. वयोमर्यादा संपल्यावर सैन्य दलात दाखल होता येत नाही. सैन्य भरतीचे स्वप्न भंगू नये याकरिता अनेक तरुण जन्मतारखेत परस्पर बदल करून वयोमर्यादा संपल्यानंतरही भरती प्रक्रियेत सहभागी होतात. त्यांच्यापैकीच आरोपी तरुणांचा समावेश आहे.
आरोपी तरुणांनी २०१६ ते २०२० या कालावधीत छावणीतील भारतीय सैन्य दलात भरतीसाठी लेखी आणि मैदानी चाचणी दिली होती. यात हे तरुण भरतीसाठी पात्र ठरल्यावर सैन्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता या तरुणांनी सादर केलेल्या जन्म तारखेच्या दाखल्यातील जन्मतारीख बनावट असल्याचे दिसून आले. जन्मतारखेत फेरफार करून ते खरे असल्याचे भासवून ते त्यांनी सादर केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समोर आल्यावर छावणी येथील सैन्य भरती अधिकारी कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (४०) यांनी याविषयी सोमवारी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.
आरोपींना नोटीस देऊन बोलावणार आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले जाईल. यानंतरही ते जर हजर झाले नाही तर त्यांना त्यांच्या गावी जाऊन अटक केली जाणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.