औरंगाबाद : जिल्हा न्यायालयासमोर असलेली दक्षिण मध्य रेल्वेच्या मालकीची कोट्यवधी रुपये किमतीची १० एकर जमीन नगर भूमापन अधिकाऱ्यांशी संगनमत करून बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच समोर आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपीविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला. भालचंद्र कुलकर्णी आणि नगर भूमापन कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयासमोर तत्कालीन अशोका हॉटेलच्या जागेमागे सुमारे १० एकर जमीन दक्षिण मध्य रेल्वेच्या मालकीची आहे. २२ ऑगस्ट २०१२ पर्यंत रेल्वेच्या नावे ही जमीन होती. जमिनीकडे रेल्वेचे लक्ष नसल्याचे पाहून नगर भूमापन कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी यांनी अन्य लोकांशी संगनमत केले आणि कागदपत्रांत खाडाखोड करून त्या जमिनीचा मालक म्हणून भालचंद्र कुलकर्णी यांचे नाव लावले. यानंतर त्यांनी कुलकर्णी यांच्या नावाचे पी. आर. कार्ड बनवले. या कागदपत्रांच्या आधारे काही लोकांनी जानेवारी २०१९ मध्ये त्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अतिक्रमण होऊ दिले नाही.
याप्रकरणी अधिकाऱ्यांनी जमिनीसंबंधी सर्व कागदपत्रांची पाहणी केली. तेव्हा २२ आॅगस्ट २०१२ ते जानेवारी २०१९ या कालावधीत आरोपींनी कागदपत्रांत खाडाखोड करून रेल्वेचे नाव कमी केल्याचे समोर आले. रेल्वेचे अभियंता हरीशकुमार कृष्ण गोपाल ताम्रकर यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री आरोपींविरुद्ध फिर्याद दिली.