लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेलूद (ता. औरंगाबाद) गावात सरपंच, उपसरपंचासह सदस्य पदांसाठी लिलाव करून पदे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व गावाने एकत्र येऊन निर्णय घेतला. मात्र, ठरल्याप्रमाणे उपसरपंचपद न दिल्याने एकजणाने या प्रकरणाची पोलखोल केली. यामुळे खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद तालुक्यात १८ डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले, तर २० डिसेंबरला निकाल जाहीर झाले; परंतु शेलूद गावात सरपंचासह नऊ सदस्यांची निवडही बिनविरोध झाली. मात्र, सरपंच, उपसरपंच व सदस्य पदांचा लिलाव करून गावाने ५ नोव्हेंबर रोजीच निवडणूक बिनविरोध केल्याचा आरोप राजू म्हस्के या ग्रामस्थाने केला.
उपसरपंच पदाची निवडणूक १३ जानेवारीला असल्याने ठरल्याप्रमाणे राजू म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरला होता; परंतु निवडणूक प्रक्रियेसाठी पाच सदस्य हजर राहणे आवश्यक आहे. यावेळी सदस्य न आल्याने निवडणूक सभा तहकूब करून १४ जानेवारीला पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली; परंतु दुसऱ्या दिवशीही पाच सदस्य संख्या पूर्ण होत नसल्याने राजू म्हस्केंसह तिघांनी संतप्त होऊन सदस्य पदाचा राजीनामा दिला.