- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : बिहार, राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण जास्त आहे, असे म्हटले जाते. मात्र, आता त्यात औरंगाबादही मागे राहिलेले नाही. येथे शाळेत शिकत असतानाच मुलींचे लग्न लावून दिले जात आहे. धक्कादायक, बाब म्हणजे या लग्नात हजर गावकऱ्यांची याला मूकसंमती मिळत आहे. चाईल्डलाईनने मागील ६ महिन्यांत ८ मुलींना बालवधू बनण्यापासून रोखले. यामुळे अनेक वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
२४ एप्रिल रोजी चाईल्डलाईनला १०९८ या टोलफ्री क्रमांकावर फोन आला की, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे १५ वर्षांच्या मुलीचे लग्न लावून देण्यात येत आहे. लगेच ग्रामीण पोलिसांच्या मदतीने चाईल्डलाईनचे सामाजिक कार्यकर्ते पथक लग्नस्थळी पोहोचले. त्याठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला होता. नवरदेवाला घेऊन वरात मारुतीरायाच्या दर्शनाला गेली होती. वधू अल्पवयीन असल्याने पोलीस विवाहस्थळी आले ही बातमी मंदिरापर्यंत पोहोचताच नवरदेवासह सर्व वऱ्हाडी तेथून गायब झाले. लग्नमंडपात अल्पवयीन वधू तिचे आई-वडील व अन्य वऱ्हाडीमंडळी हजर होते. पोलिसांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले, तसेच अल्पवयीन मुलांचे लग्न लावणे गुन्हा असल्याचेही निदर्शनात आणून दिले. त्यानंतर वर मंडळीच्या सहमतीने हा बालविवाह रोखण्यात आला.
ही जिल्ह्यातील पहिली घटना नसून मागील ६ महिन्यांत ८ अल्पवयीन मुलींचे लग्न रोखण्यात चाईल्डलाईनला यश आले. कन्नड, वैजापूर, फुलंब्री, सोयगाव, गोपाळपूर, सटाणा (करमाड), पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे लग्न लागणार होते. सर्व मुलींचे वय १५ ते १७ आहे, तर वराचे वय २० ते २५ दरम्यान होते. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्यात येत आहे. निनावी फोनमुळे असे प्रकार उजेडात येतात; पण असे अनेक विवाह होत आहेत ज्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचतच नाही. ग्रामीण भागात मागील दोन वर्षांत झालेल्या लग्नामधील अनेक विवाहिता बालवधू आहेत.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांनी सांगितले की, बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही सर्रासपणे शालेय मुलींचे लग्न लावले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वधूचे वय कमी आहे हे माहीत असतानाही गावकरी या लग्नात सहभागी होतात. कायद्यानुसार लग्न लावून देणारे व सर्व उपस्थित असणारे सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र, या कायद्याला न जुमानता अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिले जात आहे.
काय होऊ शकते शिक्षा- १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूसोबत विवाह केल्यास त्या पुरुषाला २ वर्षे सक्तमुजरी व १ लाख रुपये दंड - जाणीवपूर्वक बालविवाह ठरविल्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास २ वर्षे सक्तमुजरी आणि १ लाख रुपये दंड होऊ शकतो. - बालविवाह झाल्यास संबंधित वर व वधू यांचे आई-वडील अन्य नातेवाईक, मित्र परिवार असे सर्व ज्यांनी विवाह घडविण्यास मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केला नाही. सर्वांना २ वर्षे सक्तमजुरी, १ लाख रुपये दंड.
कोणाला होऊ शकते शिक्षा१) जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणारे.२) सोहळा पार पाडणारे.३) प्रोत्साहन देणारे वर-वधूचे आई-वडील किंवा पालक.४) नातेवाईक, मित्रपरिवार, विवाह होण्यास प्रत्यक्ष मदत करणारे.५) बालविवाह न होण्यासाठी प्रयत्न न करणारे, विवाहात सामील होणारे.
बालविवाहाला प्रतिबंध करण्याची जबाबदारी कोणाची १) गावपातळीवर- ग्रामसेवक २) तालुका पातळीवर- तहसीलदार, पोलीस निरीक्षक३) जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी४) जिल्हा पातळीवर-जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक
बालविवाहाची माहिती चाईल्डलाईनला कळवालहान मुला-मुलींच्या हक्कासाठी त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी चाईल्डलाईन ही संस्था देशभर काम करीत आहे. आपल्या गावात बालविवाह होत असेल, तर त्याची माहिती चाईल्डलाईनला १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. - अप्पासाहेब उगले, सचिव तथा प्रकल्प संचालक, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था