औरंगाबाद : पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने १५ ते १६ औषधी गोळ्या एकाच वेळी खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना पुंडलिकनगर परिसरात १२ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. पोलीस ठाण्यातील अंतर्गत वादातून हा प्रकार समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिला पोलीस कॉन्स्टेबलची नुकतीच अन्य ठाण्यात बदली करण्यात आली होती, असेही सूत्रांनी सांगितले.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला कॉन्स्टेबल (मूळ रा. बुलडाणा) यांचे ठाण्यातील एका कर्मचाऱ्यासोबत मतभेद झाले होते. यातून त्यांनी त्या कर्मचाऱ्याविरुद्ध ठाणेदार आणि वरिष्ठ अधिक ाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीनुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली नाही. उलट त्या कॉन्स्टेबलची पुंडलिकनगर ठाण्यातून अन्य ठाण्यात बदली करण्यात आली, अशी चर्चा पोलीस ठाण्यात सुरू होती. दरम्यान, १२ मार्च रोजी सकाळी महिला पोलीस कॉन्स्टेबलने वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज पाठवून तिच्यावर अन्याय होत असल्याने तिचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे कळविले. यानंतर तिने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा मेसेज प्राप्त झाल्यांनतर दामिनी पथक आणि पुंडलिकनगर पोलिसांनी पुंडलिकनगर परिसरात राहणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे घर गाठले. त्यांनी आवाज देऊनही तिने दार न उघडल्याने शेवटी दार तोडण्यात आले. यावेळी अर्धवट बेशुद्धावस्थेत पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब कळताच सहायक पोलीस आयुक्तांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या घटनेची चौकशी केली जात आहे या विषयी पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले की, महीला कॉन्स्टेबल विरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची नुकतीच बदली करण्यात आली. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजले या घटनेची चौकशी केली जात आहे.