- गजानन दिवाण
औरंगाबाद : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या गाईडलाईनचे पालन न केल्यानेच पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात बिबट्याचामृत्यू झाला. बेशुद्ध केल्यानंतर कुठलीच काळजी न घेतल्याने त्याचे हृदय बंद पडले. शवविच्छेदन अहवालातूनच ही बाब समोर आली आहे.
सहा तासांच्या थरारानंतर पिकात लपलेल्या या बिबट्याला दोन दिवसांपूर्वी वन विभागाने पकडले होते. गौताळा अभयारण्यात घेऊन जात असताना रविवारी सायंकाळी या बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पोटात अन्न नसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा वन विभागाने केला असला तरी त्यात तथ्य नाही. प्राणी भुकेला असल्यास अनेक दिवस जगू शकतो. त्यामुळे त्याचे हृदय बंद पडत नाही, अशी माहिती पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. विजय रहाटे यांनी ‘लोकमत’ला दिली.
वन विभागाच्या कर्मचा-यांनी रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान काळजी न घेतल्यानेच असे घडल्याचा आरोप विदर्भातील दिशा फाऊंडेशनचे यादव तरटे यांनी केला आहे. या बिबट्याला पकडतानाची क्लिप त्यांनी पाहिल्यानंतर प्रधान मुख्य वन संरक्षकांना यासंदर्भात निवेदन पाठवून घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या गाईडलाईनचे पालन केले गेले नाही. पकडल्यानंतर त्याला ट्रँक्विलाईज (भुलीचे इंजेक्शन) का केले? ते केल्यानंतरही योग्य ती काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे बिबट्याचा बळी गेल्याचा आरोप तरटे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी औरंगाबादेतील वन्यजीवप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केली आहे.
निष्काळजीपणामुळे झाला मृत्यू वन विभागाच्या म्हणण्यानुसार, कन्नड येथील प्रशिक्षित पथकाने ही कामगिरी केली; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पथक येण्याआधीच बिबट्याला पकडण्याची मोहीम फत्ते झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी वेगळे पिंजरे लागतात. याठिकाणी माकडाच्या पिंजऱ्यातच त्याला पकडण्यात आले आणि भूल देऊन त्याच पिंजऱ्यात औरंगाबादला आणले गेले. पकडल्यानंतर बेशुद्धीचे इंजेक्शन देताना बिबट्याच्या मानगुटीवर अनेक जण बसलेले व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये स्पष्ट दिसतात. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्याला मोकळी हवा मिळण्यासाठी काही काळजी घ्यायला हवी. ती न घेतल्याने या बिबट्याने दम तोडला. जमावबंदीचा आदेश असताना मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला व गोंधळ निर्माण झाला. वन विभागाच्या कर्मचा-यांनाच पकडण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे आणि अनेक जण मानेवर बसल्यानेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पाठक यांनी केला.
म्हणे भुकेमुळे मृत्यूशवविच्छेदन अहवालात हृदय बंद पडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तो उपाशी असावा म्हणून त्याचा मृत्यू झाला असावा, असा दावा मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी केला. प्रशिक्षित कर्मचा-यांनीच त्याला पकडले, असेही ते म्हणाले.
भुकेमुळे हृदय बंद पडत नाहीप्राणी उपाशीपोटी अनेक दिवस जगू शकतात. मात्र, पोटात अन्न नसल्याने बिबट्याचे हृदय बंद पडू शकत नाही, अशी माहिती पशुवैद्यकीयतज्ज्ञ अमरावतीचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी दिली.