औरंगाबाद : संजयनगर मुकुंदवाडीतून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह चिकलठाणा बाजार तळाजवळील पुलाखाली चिखलात रुतलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी आढळून आला. दशरथ भागाजी देहाडे (८५, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
१७ डिसेंबर रोजी देहाडे हे घरात काही न सांगता चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या मुलांकडे भेटण्यासाठी गेले होते. ते घरी परत आले नसल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. परंतु ते कुठेही आढळून आले नाही. याबाबत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी दिली होती. ३ जानेवारीला सकाळी या वृद्धाचा मृतदेह सापडला. एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, फौजदार कैलास अन्नलदास व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांच्या मदतीने गाळातून काढला मृतदेहपोलीस हेड कॉन्स्टेबल बोहरा, गणपतसिंग बायस, गणेश जाधव, नागरिक रामू मुंगासे, शेख मुजीब, संदीप साबळे, कैलास जाधव, अल्ताफ पटेल यांच्या मदतीने अर्धातास प्रयत्नानंतर देहाडे यांचा मृतदेह गाळातून बाहेर काढण्यात यश आले.
शौचास गेल्यावर चिखलात रुतल्याचा संशयवयोवृद्ध देहाडे हे शौचास नदीत उतरले असावे. त्याचवेळी पुलाखाली चिखलात रुतून पडल्याने ही घटना घडली असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला.
मृतदेह नातेवाइकांनी ओळखलाकुजल्याने मृतदेहाची ओळख पटणे शक्य नव्हते; परंतु मृतदेहासोबत डोक्यावरील फेटा, काडीपेटी, बिडीवरून मुलगा राजू देहाडे यांनी व इतर नातेवाइकांनी मृतदेह ओळखला. सायंकाळी शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचे एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, अधिक तपास फौजदार कैलास आन्नलदास करीत आहेत.