औरंगाबाद : शहरात बोगस लस प्रमाणपत्र (Bogus vaccine certificate racket in aurangabad ) देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात जिन्सी पोलिसांनी मंगळवारी यश आले आहे. खबऱ्याच्या माहितीवरून प्लस रुग्णालयात छापा टाकून पोलिसांनी एका डॉक्टरसह दोघांना रंगेहाथ अटक केली. आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक बोगस लसीकरण प्रमाणपत्र आढळून आली आहेत. धक्कादायक म्हणजे, केवळ ६०० ते १००० रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाइंड शिवूर ( ता. वैजापूर ) ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी असल्याचे उघडकीस आले आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination in Aurangabad ) कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अनेक सुविधा देण्यात येणार नाहीत, तसेच १५ डिसेंबरपासून दंड लावण्यात येणार आहे. यामुळे अनेकजण यातून पळवाटा शोधत बोगस प्रमाणपत्र काढत असल्याची गुप्त माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे रॅकेटमधील काही जणांशी संपर्क केला. लस न घेता प्रमाणपत्र देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. यानंतर जिन्सी पोलिसांच्या पथकाने प्लस हॉस्पिटल ( व्हीआयपी फंक्शन हॉल जवळ ) येथे छापा टाकला. यावेळी येथील डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली. तिघांच्या मोबाईलमध्ये अनेकांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. लसीकरणातील ही बोगसगिरी समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय अधिकारी रॅकेटचा सूत्रधार प्लस हॉस्पिटल येथील डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक हे तिघे वैजापूर तालुक्यातील शिवुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन यास आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक पाठवत असत. यानंतर तेथे कार्यरत सिस्टर आढाव व शहेनाज शेख यांनी लस दिल्याचे बोगस प्रमाणपत्र देण्यात येत होते. ही कारवाई पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपयुक्त दीपक गीऱ्हे, सपोआ निशिकांत भुजबळ, जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोह शेख गाणी, पोहकॉ जगताप, पोना परदेशी, पोना जफर पठाण, पोशि बमनात, पोकॉ सरिता कुंडारे यांच्या पथकाने केली.