सदर अकरावर्षीय बालकास कर्करोगाचा आजार देखील होता. त्यासंदर्भात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. ९ मे रोजी औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान २२ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. तालुक्यात सर्वात लहान वयाचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी सांगितले.
कोरोनाची तिसरी लाट ही लहान बालकांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. तालुक्यातील नागरिकांनी बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. जेणेकरून लवकर निदान व लवकर उपचार मिळू शकतील, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
तालुक्यात पहिलीच घटना
कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि तरुणांचा समावेश होता. तालुक्यात प्रथमच एका ११ वर्षीय मुलाचा कोरोनाने बळी गेल्याची घटना घडली आहे.