- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादेत आरोग्य कर्मचार्यांच्या नावाखाली खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना, मोलकरीण यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात जवळपास ३३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. परंतु यात रुग्णसेवेशी काडीचा संबंध नसलेल्या लोकांचीही नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरकडे घरी काम करणाऱ्या व्यक्तीला डोस देण्यात आला. परंतु हा प्रकार फक्त एका रुग्णालयापुरता मर्यादीत नाही. तर अनेकांनी अशाप्रकारे रुग्णसेवेशी संबंध नसलेल्या लोकांना लसीचा डोस देण्याचा प्रकार सुरु असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
....तर कारवाईज्या लाभार्थ्यांचे नाव अँपवर नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच डोस दिला जात आहे. परंतु रुग्णालयांकडून कर्मचाऱ्यांची यादी पदनाम नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून नोंदणी करण्यात आली आहे. जर असे काही घडत असेल तर कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.