औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील सहावर्षीय ‘करिना’ या वाघिणीने बुधवारी पहाटे ५.२० वाजता शेवटचा श्वास घेतला. करिनाला किडनीचा विकार असल्याचे कालच निदान झाले होते. तिच्यावर उपचार करण्यासाठी परभणी येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मंगळवारी मध्यरात्री प्राणिसंग्रहालयात दाखल झाले. या पथकाने औषधोपचार सुरू करतानाच करिनाने या जगाचा निरोप घेतला.मंगळवारी सायंकाळी करिनाची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. ‘करीना’च्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये कोरोना नसल्याचा उल्लेख असल्याची माहिती मनपा प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी दिली.
प्राणिसंग्रहालयातील समृद्धी आणि सिद्ध या पिवळ्या वाघाच्या जोडीपासून करिनाने सहा वर्षांपूर्वी जन्म घेतला होता. ती प्राणिसंग्रहालयातच लहानाची मोठी झाली. ती एका स्वतंत्र कक्षात राहत होती. रविवारी रात्रीपासून तिने अचानक अन्न खाणे बंद केले होते. प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अशक्तपणा वाढू लागल्याने त्वरित तीला प्राणिसंग्रहालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून ती सलाईनवर होती. खडकेश्वर येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. व्ही. डी. जोशी, पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. दिघोळे, डॉ. बी. बी. गायकवाड यांनी उपचार सुरु केले.
मंगळवारी सकाळी तिच्या रक्ताचे, लघवीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. काल सायंकाळी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये किडनीचा विकार असल्याचे सांगण्यात आले. तातडीने परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. डॉ. जी. आर. गंगणे, सहयोगी प्राध्यापक तौहीद शफी, क्ष-किरणतज्ज्ञ गजानन ढगे आदींच्या पथकाने मंगळवारी रात्री औषधोपचार सुरू असतानाच पहाटे तिची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये ती मरण पावली.
प्राणिसंग्रहालयातच अंत्यसंस्कार : करिनाच्या मृत्यूनंतर प्राणिसंग्रहालयात शवविच्छेदन करण्यात आले. पंचनामा करून याच परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर अंत्यसंस्कार करण्यात आले.