औरंगाबाद : खुनाचा आरोप असलेल्या कैद्याला पॅरोलवर सोडण्यासाठी हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून २ लाख रुपयांची मागणी करणारा कॉल कैद्याच्या मुलाला केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली. या घटनेची गंभीर दखल घेत अपर पोलीस महासंचालक (जेल) यांनी उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्याकडे चौकशी सोपविल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जेलमधून सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर मोक्का आणि बॉम्बस्फोटांतील कैद्यांना वगळून जे कैदी यापूर्वी पॅरोल अथवा फर्लो रजेवर जाऊन जेलमध्ये परत आले त्यांना प्रथम ४५ दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार कारागृह अधीक्षक यांना कैद्यांना पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला होता. यादरम्यान बिडकीन येथील खुनाच्या कैद्याला पॅरोलवर सोडण्यासाठी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर कॉल करून २ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
कारागृहात मोबाईल वापरण्यास मनाई आहे, असे असताना एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तेथील एका जेलरचा मोबाईल लॉकरमधून काढून त्यावरून कॉल करण्यात आले. वाळूजमध्ये झालेल्या एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या कैद्याने यासाठी पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या कैद्यानेच बिडकीन येथील मुलाकडे पैशाची मागणी केली. कैद्याच्या मुलाने २ लाख रुपये ही रक्कम त्याच्याकडे नसल्याचे सांगितल्यावर वडिलांसाठी ही रक्कम कमी सांगितल्याचे तो म्हणाला. दीड मिनिटाचे हे संभाषण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी चौकशी करण्याचे झळके यांना दिले. हर्सूल जेलचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी मात्र याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.