औरंगाबाद : कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच प्रशासकीय यंत्रणेकडून आता मोठ्या चुका होत असल्याचे समोर येत आहे. विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असतानाही त्यांना निगेटिव्ह असल्याचे सांगून घरी पाठवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झालेली चूक लक्षात येताच मंगळवारी दुपारी परत रुग्णांना उपचारासाठी नेण्यात आले.
वॉर्ड क्रमांक ५ वानखेडेनगर येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोना आजाराची लागण झाली. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संशयित रुग्ण ठरवून विद्यापीठातील रमाई या इमारतीत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्याही लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. कुटुंबातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या असताना त्यांना निगेटिव्ह असल्याचे सांगून सोमवारी घरी पाठवून देण्यात आले. झालेली चूक लक्षात येताच महापालिकेच्या यंत्रणेने संबंधित रुग्णांना फोन करून सांगितले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. हे ऐकून संबंधित कुटुंबियांना मोठा धक्का बसला. आज दुपारी रुग्णवाहिका पाठवून त्यांना राहत्या घरातून उपचारासाठी नेण्यात आले.
नागरिकांच्या जिवाशी खेळणेया गंभीरप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राज वानखेडे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे तक्रार केली. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आरोग्य यंत्रणेने थांबवावा. कोरोना आजारांमध्ये अशा पद्धतीने अनेक ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल. याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.