लासूर स्टेशन : शेती व्यवसायाची अवस्था वाईट झाल्याने शेतकरी कुटुंबात कोणी मुलगी द्यायला धजावत नाही. परिणामी शेतकरी तरुणाचे लग्नच जुळत नाही. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे डोमेगाव (ता. गंगापूर) येथील शेतकऱ्याचा ३२ वर्षीय मुलगा बापूराव कडू सोलनकर याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी ८.३० वाजता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येसगाव डिघी रस्त्यावर डोमेगाव शिवारातील एका चिंचेच्या झाडाला तरुणाने गळफास लावल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी गावात माहिती दिली. पोलीस पाटलांनी शिल्लेगाव पोलिसांना कळविले. तो डोमेगाव येथील शेतकरी कडू सोलनकर यांचा मुलगा बापूराव सोलनकर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बापूरावचा देह शासकीय रुग्णालयात दाखल केला. काल बापूरावचे वडील, आई आणि भाऊ नातेवाईकाकडे गेले होते, तो एकटाच घरी होता. मध्यरात्री नैराश्येतून त्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
कडू सोलनकर यांना तीन मुले. एकरभर बागायती शेतीच्या भरवशावर ते कुटुंबाचा गाडा नेटाने हाकत आले. याचबरोबर कडू सोलनकर व त्यांची पत्नी मोलमजुरीही करतात. लग्नानंतर मोठा मुलगा वेगळा झाला. बापूराव शेतात राबून बांधकाम मजूर म्हणूनही काम करीत होता. लहान भाऊ कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बकऱ्या सांभाळतो. मुलगा बापूराव विवाहयोग्य झाल्याने नातेवाईकांनी स्थळांबाबत चौकशी करायला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी योग्य, पण मुलगा शेती व्यवसायात. आणि शेती व्यवसाय तर मोठा अडचणीत. वयाची ३२ वर्षे पूर्ण झाली, तरी विवाहसंबंध जुळत नव्हते. कमी जमीन, त्यात तिघे भाऊ. त्यामुळे मुलीचे स्थळ त्याच्यासाठी येत नव्हते, ही चिंता कायम सतावत होती.