जालना : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्याकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच तिन्ही कंत्राटी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात आम आदमी पार्टीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कंत्राटी म्हणून कार्यरत असलेले जिल्हा समन्वयक गुरूराज थट्टेकर, जिल्हा प्रमुख अमित दरक आणि आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आपारे यांनी एका रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी चार लाख रुपयांची मागणी केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना ही माहिती कळविली. शिंदे यांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तिन्ही अधिकाऱ्यांना काम थांबविण्याचे निर्देश दिले असून, त्यांच्यावर निलंबनासह चौकशी अंती आणखी गंभीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. आम आदमी पार्टीचे मराठवाडा विभागीय सचिव अनिल ढवळे, अॅड. योगेश गुल्लापेल्ली, संजोग हिवाळे, मुकुल निकाळजे, बळीराम कोलते, रविकुमार सूर्यवंशी आदींनी ही तक्रार दिली होती.
अधिकारी आणि डॉक्टर यांच्यातील व्हायरल झालेला संवाद...डॉक्टर : तुम्ही पहिले काय म्हटले की, आम्ही आॅडिट करणार नाही. डायरेक्ट वर्षभरानेच इन पॅनल करून देतो. तुम्ही अशी टर्म चेंज करायला लागले सगळी.अधिकारी : सर, तुमचा काय विषय झाला मला सांगितलं त्यांनी.डॉक्टर : ते म्हटले ना की एक वर्षाने अॅडिट होईल तुमचे. दुसरा अधिकारी : दोन- तीन महिन्यांनी होईल, असे म्हटलो होतो.डॉक्टर : मग पैसे द्यायचा काय संबंध? मग चार लाख रूपये?पहिला अधिकारी : कन्डीशन्स बदलत राहतात. हे तुम्ही मान्य करतात की नाही करता?डॉक्टर : नाही, पण ते आता म्हणतात आॅडिट होऊ शकत नाही. कसे करणार मग? अधिकारी : एकदम बरोबर आहे सर.डॉक्टर : तुम्ही आता चार लाख रूपये घेतले ना? मग काय केलं आतापर्यंत?पहिला अधिकारी : सर, इकडे बघा आम्ही तुम्हाला प्रिप्रेशन करून देतो.डॉक्टर : आहो, मीच करतोय प्रिप्रेशन. तुमचा काय त्याच्यामध्ये संबंध आला? तुम्हाला मला आॅडिटला मदत करणे आहे. चार लाख रूपये घेऊन तुम्ही काय केलं? तुम्हीच बोलता आणि परत शब्द बदलता.अधिकारी : असे आम्ही कुठेच काही केले नाही.डॉक्टर : तुम्ही काय सांगितले? सर, तुम्ही मला चार लाख रूपये द्या. मी तुमचे इनपॅनल आणून देतो. तुमचे एक वर्षाने आॅडिट होईल. म्हटले की नाही?दुसरा अधिकारी : सर, आॅडिट होत नाहीत काही हॉस्पिटलचे. त्यांना डायरेक्ट इनपॅनल पण भेटतं, असे बोललो आम्ही. डॉक्टर : अहो, तुम्ही म्हटले ना. ठीक आहे ना तुम्हाला इनपॅनल करून द्यायचय ना,तुम्ही एवढे एवढे पैसे द्या. मग मी तुम्हाला कशाला पैसे दिले असते. मला सगळंच करायचे मग कशाला तुम्हाला पैसे देऊ ? अधिकारी : सर, एक मिनिट.डॉक्टर : असे नाही, तुम्हाला मला आॅडिटला सगळ्याच मशिनरी दाखविणे आहे. तुम्ही जर नसेल करत तर इथे ब्रेक करा. अधिकारी : ठिक आहे ना सर.डॉक्टर : कारण तुम्ही म्हणाल मी सीआर्म दाखविणार नाही. मी हे करणार नाही.