औरंगाबाद : घाटी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन संपल्याने ऐनवेळी सिलेंडर लावून रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ बुधवारी सकाळी ओढावली. त्यामुळे घाटी प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची अवस्थाही समोर आली आहे.
घाटी रुग्णालयात मेडिसीन विभागासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक आहे. यातून कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सीजन पुरवले जात आहे. सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजनची सुविधा सुरळीत राहील, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे, परंतु लिक्विड ऑक्सिजन संपेपर्यंत त्याकडे कोणाचेही लक्ष गेलेच नाही. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत होईपर्यंत रुग्णांना जंबो सिलेंडर लावून ऑक्सिजन देण्याची कसरत घाटीला करावी लागत आहे. लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्यात वाहन अन्य ठिकाणी गेल्याने हा प्रकार घडल्याचे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.