- राम शिनगारे
औरंगाबाद : मराठवाड्याचे विकास महर्षी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सक्रिय योगदानामुळे मराठवाड्यातील चळवळीचे केंद्र बनलेल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्यांचे तैलचित्र हद्दपार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यास संस्थेचे अध्यक्ष राम भोगले यांनीही दुजोरा दिला.
मराठवाड्यातील युवकांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे स्थापना १९१५ साली करण्यात आली. हैदराबाद हायकोर्टातील न्यायमूर्ती मौलवी सय्यद महंमद गुलाम जब्बार साहेब यांनी यासाठी आश्रयदात्याची भूमिका बजावली, तर पहिले अध्यक्ष म्हणून पंडितराव पारगावकर वकील यांनी काम पाहिजे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो युवकांना शिक्षण देण्याचे काम केले आहे. या संस्थेचे अध्यक्षपद दिग्गज व्यक्तींनी भूषविले. त्यामध्ये गोंविदभाई श्रॉफ यांचाही समावेश आहे. त्यांच्या काळातच संस्थेला जनमानसात एक स्थान निर्माण करता आले. शिक्षणाचा बाजार होऊ नये हे पथ्य गोविंदभार्इंनी तर पाळले. मृत्यूनंतर त्यांचा अत्यंविधी स.भु. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावरच करण्यात आला. त्याठिकाणी त्यांचे स्मृतिस्थळही आहे. पुण्यतिथी, जयंतीला गोविंदभाई श्रॉफप्रेमी नागरिक, स्वातंत्र्यसैनिक नियमितपणे अभिवादनासाठी येतात.
संस्थेसाठी जीवन वाहून घेतलेल्या गोविंदभाई श्रॉफ यांचे योगदान नाकारण्याचा गंभीर प्रकार नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीने सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील बोर्ड रूममध्ये गोविंदभाई श्रॉफ यांचे भव्यदिव्य असे तैलचित्र फ्रेम करून भिंतीवर लावण्यात आलेले होते. या बोर्ड रूममध्ये संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठका नियमितपणे होतात. प्रत्येक निर्णय घेताना गोविंदभार्इंच्या विचारांचे स्मरण व्हावे, यासाठी लावण्यात आल्याचे संस्थेचे माजी पदाधिकारी सांगतात.
मात्र, विद्यमान कार्यकारिणीतील अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षांनी हे तैलचित्र काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना संस्थेच्या विकासात सर्वच अध्यक्षांचे योगदान राहिले आहे. त्यामुळे एकट्या गोविंदभार्ईंचेच छायाचित्र न ठेवता संस्थेच्या नाट्यगृहात सर्वच माजी अध्यक्षांचे छायाचित्र लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यास संस्थाध्यक्ष राम भोगले यांनी दुजोरा दिला.
संस्थेच्या विकासात गोविंदभार्इंचे योगदान किती?संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील गोविंदभार्इंचे तैलचित्र काढताना संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गोविंदभार्इंचे संस्थेच्या विकासात योगदान किती? एवढे वर्षे अध्यक्ष असताना संस्थेचा विस्तार केला नाही. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये संस्थेला त्यांच्या राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी असलेल्या संबंधामुळे तात्काळ मिळाली असती. मात्र, त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे स्तोम माजविण्याची काहीही गरज नाही, असा आक्षेप नवनिर्वाचित पदाधिकारी घेतात, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. यातूनच तैलचित्र काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापेक्षाही संघ विचाराच्या पदाधिकाऱ्यांना समाजवादी अशी ओळख असलेल्या संस्थेचा चेहरा बदलण्यासाठी थेट गोविंदभार्इंनाच कार्यालयातून हद्दपार केल्याचेही बोलले जात आहे.
पदाधिकाऱ्यांची लपवाछपवीतैलचित्र काढल्याच्या प्रकाराविषयी माहिती मिळताच ‘लोकमत’ प्रतिनिधीने संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी संस्थेचे सचिव डॉ. नंदकुमार उकडगावकर, कोषाध्यक्ष अरुण मेढेकर यांची भेट घेतली. त्यांना घडलेल्या प्रकाराविषयी विचारले असता, त्यांनी आम्हाला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. याविषयी संस्थेच्या अध्यक्षांनाच विचारा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश वकील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण पुण्यात असून, तैलचित्र काढण्याविषयी काहीही माहीत नसल्याचे सांगितले.
बोर्ड रूममध्ये एकट्या गोविंदभार्इंचेच तैलचित्र होते. आतापर्यंत जेवढे अध्यक्ष झाले त्या सगळ्यांचेच तैलचित्र त्यामागच्या ऑडिटोरियममध्ये लावण्यात येणार आहेत.- राम भोगले, अध्यक्ष, श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था