औरंगाबाद : कपाशीच्या पिकांचे हरणांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात गेलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करत अक्षरशः लचके तोडले. अत्यंत धक्कादायक घडलेल्या या घटनेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ८ वाजता लासूर स्टेशन येथील एकबुर्जी वाघलगाव येथे घडली आहे.
कप्पुसिंग बाळाराम काकरवाल (वय 75) असे मयताचे नाव आहे. कप्पुसिंग यांचे शेत गावाच्या उत्तरेला असून, तेथे ते आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतातील कपाशीच्या पिकांचे हरणांपासून संरक्षण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात फिरत असलेल्या दहा मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. अत्यंत हिंस्त्र असलेल्या या कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे लचके तोडले. कुत्र्यांचा हा हल्ला तब्बल दीड तास सुरू होता. या भयंकर हल्ल्यात कप्पुसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. रतन कोंडीराम बिघोत हे बैलांना चारा टाकण्यासाठी शेताकडे जात असताना त्याच्या नजरेस हा प्रकार आला.
दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेने आणून सोडलेल्या कुत्र्यांमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूवीर्ही दोन वासरे व एका बकरीचा फडशा अशाच पद्धतीने मोकाट कुत्र्यांनी पाडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.