बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६५ गावांपैकी ७६ गावांतील पाण्याचे नमुने जून महिन्यात तपासण्यात आले. त्यापैकी २२ गावांतील पाण्याची नमुने दूषित आढळून आल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे तपासणीत समोर आले आहे.
मानवी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर पिण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यकच आहे. डोळ्याने स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यास योग्यच असते असे नाही. स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये मानवास हानिकारक ठरू शकणारे लाखो जीवजंतू असू शकतात. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आजार डोके वर काढतात. परिणामी आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते.
तालुक्यातील लाडगाव प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक पाणी नमुने दूषित आढळून आले. यात नांदगाव, जरूळ, लाख खु., बिलोणी, भऊर व नारायणपूर या गावांचा समावेश आहे. गाढेपिंपळगाव केंद्रांतर्गत चांदेगाव, बाजाठाण, देवगाव शनी, माळी घोगरगाव, शक्ती या गावांचा समावेश आहे. बोरसर केंद्रांतर्गत खिर्डी, बोरसर, भिंगी, पानगव्हाण, परसोडा या गावांतील पाणी दूषित आढळून आले. शिऊर केंद्रांतर्गत जानेफळ व खंडाळा या गावातील पाणी दूषित आढळून आले. जून महिन्यात वैजापूर शहरातील २० पाणी नमुने घेण्यात आले. त्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर दोन नमुने दूषित आढळून आले.
----
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
विषमज्वर, काॅलरा, हागवण, अतिसार, पोलिओ, कावीळ, आमांश, आतड्याचे आजार, जंत हे आजार दूषित पाण्यामुळे उद्भवतात.
---
पाणी दूषित होण्याची कारणे : (कोरोनामुळे नमुने घटले, या कॉलमऐवजी ही चौकट वापरावी)
बोअरवेलजवळ शंभर फुटांच्या आत शोषखड्डे अथवा अन्य घाण पाणी असल्यास बोअरवेलमधील पाणी दूषित होऊ शकते.
विहिरीतील पाणी पालापाचोळा पडून किंवा कठडे नसल्याने दूषित होऊ शकते.
पाईपलाईनद्वारे येणारे पाणी हे गळके पाईप, लिकेजमुळे दूषित होऊ शकते.
---
ज्या गावात तपासणीच झाली नाही त्यांचे काय ?
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या काही गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. त्यातील दूषित नमुन्यावरून उपाययोजना केल्या जातील. परंतु, ज्या गावांतील पाणी नमुन्याची तपासणीच झाली नाही, तेथील नागरिकांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ना तपासणी, ना उपाययोजना असे म्हणण्याची वेळ त्या गावांवर आली आहे.
---
शुद्ध पाण्यासाठी करा हे उपाय
प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासणे शक्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जागृत होऊन स्वत:च उपाययोजना करण्याची गरज आहे.
विहिरीतून किंवा बोअरवेलमधून मिळालेले पाणी उकळूनच प्यावे.
पिण्याची भांडे कायम धुऊन स्वच्छ करावे.
पाण्यात तुरटीचा वापर करावा. घरावरील उंच टाकीत ब्लीचिंग पावडर वापरावी.
ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक विहिरीच्या पाण्यात औषधी व ब्लीचिंग पावडरचा वापर करावा.
----
गावातील नमुने घेतले तपासणीसाठी : ७६
गावातील नमुने आढळले दूषित : २२
---
वैजापूर शहरातील २ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
२० ठिकाणचे नमुने घेतले
२ ठिकाणचे नमुने आढळले दूषित
१८ ठिकाणचे नमुने चांगले आढळले.