अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाच्याकोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख न पटल्याने नातेवाईक दुसराच मृतदेह बीड येथे घेऊन गेले. बीड येथे पोहोचल्यानंतर मृतदेहाच्या कुटुंबियांनी हा मृतदेह आपला नाही, असे सांगताच पुन्हा तो मृतदेह अंबाजोगाईच्या रुग्णालयात आणण्यात आला व त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह शाेधून तो नेला. शनिवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली.
सदरील प्रकारात नातेवाईकांचीच चूक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. बीड येथील ३५ वर्षीय तरूणाला उपचारासाठी अंबाजोगाईत दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन विभागाच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आला. शनिवारी रात्री बीडहून नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी आले. त्या नातेवाईकांनी मृतदेहाची व्यवस्थित ओळख न पटवताच कोल्ड स्टोअरेजमधील मृतदेह नेला. बीड येथे गेल्यानंतर कुटुंबियांनी हा मृतदेह ‘तो नाही’ असे सांगताच पुन्हा तो मृतदेह अंबाजोगाईच्या स्वा. रा.ती. रुग्णालयात आणून ठेवण्यात आला व परत नातेवाईकांच्या ओळखीने मृतदेहाची ओळख पटवून त्यांना अपेक्षित असलेलाच मृतदेह नेण्यात आला.
मृतदेह अदलाबदल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्यावतीने वरिष्ठ प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. शव नातेवाईकांना देताना शासनाच्या काही विहित नियमावली आहेत. त्याबाबत व इतर बाबींची समिती पाहणी करणार असून या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.