छत्रपती संभाजीनगर : अंगणवाड्यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजना राबविल्यानंतरही हजारो बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या महिन्यात झालेल्या तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसहा हजारांहून अधिक बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकली आहेत. त्यामुळे मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणाचा शून्य स्तर कधी गाठणार आहे की नाही, असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्प असून, त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांमार्फत प्रत्येक महिन्याला बालकांचे वजन व उंचीच्या नोंदी घेतल्या जातात. त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. यासाठी पोषण आहारासह वेगवेगळ्या उपाययोजनाही राबवल्या जातात. बालकांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे, यासाठी बालकांच्या वजन-उंची व आरोग्याची सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲपद्वारे प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचवली जाते. असे असतानाही तपासणीमध्ये जिल्ह्यातील तब्बल साडेसहा हजारांहून अधिक बालके कुपोषित असल्याची बाब समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने तातडीने अतितीव्र कुपोषित (सॅम श्रेणी) आणि तीव्र कुपोषित कुपोषित (मॅम श्रेणी) बालकांवर आवश्यक उपचार व सात्त्विक आहार देण्यासाठी त्यांना ग्रामीण बालविकास केंद्रात (व्हीसीडीसी) दाखल करावे किंवा इतर दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांना सुव्यवस्थित पद्धतीने संदर्भ सेवा मिळवून देण्याची कृती करणे गरजेचे असते. पण, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाला जिल्ह्यात किती ‘व्हीसीडीसी’ सुरू आहेत, किती बालकांना संदर्भ सेवा अर्थात आरोग्य केंद्रांत दाखल करण्यात आले आहे, याची माहितीच नाही. यावरून कुपोषित बालकांसाठी जीवनरक्षणाची मोहीम किती गांभीर्याने घेतली जात असेल हे यावरून लक्षात येते.
आकडेवारी बाेलतेछत्रपती संभाजीनगर तालुक्यात दोन एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अतितीव्र कुपोषित अर्थात सॅम श्रेणीत २७१ बालके, तर तीव्र कुपोषित मॅम श्रेणीत ११७९ बालके आहेत. फुलंब्री तालुक्यात एक प्रकल्प असून, त्या अंतर्गत सॅम श्रेणीत ६९, तर मॅम श्रेणीत २९५ बालके, सिल्लोड तालुक्यात २ प्रकल्पांतर्गत सॅम श्रेणीत २६१, तर मॅम श्रेणीत ७६७ बालके, सोयगाव तालुक्यात एक प्रकल्प असून, सॅम श्रेणीत १५०, मॅम श्रेणीत ४३९ बालके, कन्नड तालुक्यात २ प्रकल्पांतर्गत सॅम श्रेणीत २००, तर मॅम श्रेणीत ४३० बालके, खुलताबाद तालुक्यात एक प्रकल्प असून, सॅम श्रेणीत ५७, तर मॅम श्रेणीत २२३ बालके, गंगापूर तालुक्यात २ प्रकल्पांतर्गत सॅम श्रेणीत २६२, तर मॅम श्रेणीत ११६७ बालके, वैजापूर तालुक्यात एक प्रकल्प आहे. त्यात सॅम श्रेणीत २३७, तर मॅम श्रेणीत ६०४ बालके आणि पैठण तालुक्यातील दोन प्रकल्पांतर्गत सॅम श्रेणीमध्ये २३३, तर मॅम श्रेणीत ६४९ असे एकूण जिल्ह्यात सॅम श्रेणीत १५०३ आणि मॅम श्रेणीत ५१४९ असे मिळून ६ हजार ६५२ कुपोषित बालके आढळून आली आहेत.