- योगेश पायघन
औरंगाबाद : कृषी विभागाने नमुन्यांसाठी घेतलेल्या १५८६ बियाणांपैकी १९४ नमुने अप्रमाणित निघाले. त्यापैकी ४४ कंपन्यांना ताकीद देण्यात आली असून, १५० बियाणांच्या उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.
मूग, कापूस, मका, सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे यंदा मकाला लष्करी अळीपासून वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले, तर आंतरपिकेही चांगली आहेत. त्यातही तुरीचे ७११ हे वाण चांगले उत्पन्न देईल. सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या स्थितीत आहेत. सिल्लोड, कन्नड, जाफ्राबाद आदी काही तालुक्यांत रोग वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना बुरशीनाशक फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे मुगाला सर्वाधिक क्षती पोहोचली आहे. शेंगा काढणीच्या वेळी उघडीप नसल्याने शेंगाला काही ठिकाणी कोंब आल्याचे सर्वेक्षणातून समोर येत आहे. मात्र, मका आणि कापसाला पावसाचा चांगला लाभ झाल्याचे दिसत असल्याचे डॉ. जाधव म्हणाले. यंदाची पीकपेरणी होऊन मृग नक्षत्रातच पाऊस चांगला झाला. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली आहे. अडीच ते पावणेतीन महिन्यांचे पीक झाले आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी बियाणे पावसात भिजल्याने सोयाबीनच्या सुमारे १३ हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यात बीड जिल्ह्यातून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या.
सोयाबीनच्या १३ हजार तक्रारी; ४५ गुन्हे नोंदसोयाबीनच्या औरंगाबादमध्ये८१, जालना २४२३, तर बीड जिल्ह्यातून १०,६०० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. यापैकी ४ हजार तक्रारी महाबीज, तर ९ हजार तक्रारी खाजगी कंपन्यांविरुद्ध होत्या. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत तिन्ही जिल्ह्यांत ४५ गुन्ह्यांची नोंद झाली, असे जाधव म्हणाले.
शेतमाल थेट विक्रीसाठी प्रयत्नदलाल हटवून, अधिक भावात थेट कंपन्यांना शेतमाल विक्रीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला केल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागाकडून तिन्ही जिल्ह्यांतील स्थापन सुमारे दोनशे शेतकरी कंपन्या, गटांच्या माध्यमातून थेट विक्रीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.
आजपासून पीक कापणी प्रयोगथेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतीतील पिकाची कापणी प्रयोगातून दर हेक्टरी उत्पन्नाची नोंद टीआरएप्रणालीवर केली जाते. त्यातून पीक विम्यासाठी आवश्यक मंडळातील हेक्टरी उत्पादनाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित केली जाते. त्यासाठी मुगाच्या पहिल्या पीक कापणी प्रयोगाला मंगळवारी जालना जिल्ह्यातील तातेवाडी येथून सुरुवात होत आहे. विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जाधव, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, उदय देवळाणकर यांच्या पर्यवेक्षणात हा प्रयोग होत आहे.