औरंगाबाद : घाटी रुग्णालयास अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘हाफकिन’कडून औषधी पुरवठा सुरू झाला; परंतु काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अॅसिडिटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या वेळीच निदर्शनास आल्याने सर्व वॉर्डांमधून इंजेक्शनचा साठा तातडीने काढून घेण्यात आला. या धक्कादायक प्रकारामुळे गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालल्याची ओरड होत आहे.
घाटी रुग्णालयाला वर्षभरापासून अनेक औषधींच्या तुडवड्याला तोंड द्यावे लागत आहे. आरएल, एनएस हे सलाईन्स, पॅरासिटामॉलसारखे प्राथमिक औषध, प्रतिजैविके, अॅन्टिरेबिज व्हॅक्सिन (एआरव्ही), मेट फारमिन, आयसो सरबाईट, मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींअभावी गोरगरीब रुग्णांची मोठी अडचण होते. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या महिनाभरापासून ‘हाफकिन’कडून घाटी रुग्णालयास औषधींचा पुरवठा सुरू झाला. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली.
घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच रॅनिटिडीन नावाच्या इंजेक्शनच्या चार बॅचचा पुरवठा करण्यात आला होता. अनेकदा रुग्ण काही खाऊ शकत नाही. प्रतिजैविकांचे इंजेक्शन दिल्यानंतर तेव्हा अनेकदा रुग्णांच्या पोटात आग होते. रुग्णांना अॅसिडिटीचा त्रास होतो. अशावेळी रुग्णांना रॅनिटिडीन इंजेक्शन दिले जात असल्याचे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.
हे इंजेक्शन घाटीतील वॉर्डांमध्ये पाठविण्यात आले होते; परंतु पाठविण्यात आलेल्या इंजेक्शनच्या एका बॅचमध्ये बुरशीसदृश प्रकार काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास पडला. त्यामुळे हा प्रकार ड्रग्ज स्टोअरच्या प्रमुखांना कळविण्यात आला. यानंतर तातडीने खबरदारी म्हणून वॉर्डांमधून सर्व साठा काढून घेण्यात आला. त्यांचा वापरही थांबविण्यात आला. यासंदर्भात ‘हाफकिन’लादेखील माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
रुग्णाला दिले नाहीत
रॅनिटिडीन इंजेक्शन वापरण्यात येऊ नये, अशी सूचना ड्रग्ज स्टोअरकडून करण्यात आली. त्यानुसार सर्व इंजेक्शन काढून घेण्यात आले आहेत. एकाही रुग्णाला हे इंजेक्शन देण्यात आले नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.
‘हाफकिन’ला माहिती दिली
संबंधित इंजेक्शन हे वापरण्यायोग्य नसल्याच्या सूचना वॉर्डांतून प्राप्त झाल्या. त्यामुळे रुग्णहित लक्षात घेऊन वॉर्डांमधून इंजेक्शन काढून घेण्यात आले आहे. एका बॅचमध्येच दोष आढळला आहे. त्यात नेमका काय दोष आहे, हे तपासणीनंतरच समोर येईल. यासंदर्भात संचालक आणि ‘हाफकिन’ला माहिती देण्यात आली आहे.
- डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)