औरंगाबाद : ऑनलाईन शिक्षणासाठी मुख्याध्यापकाने तयार केलेल्या एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर खुद्द पालकानेच अश्लील लिंक शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार २० जून रोजी घडला. हा खळबळजनक प्रकार समोर येताच मुख्याध्यापकाने सायबर पोलीस ठाण्यात त्या पालकाविरुद्ध तक्रार केली.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळांनी आॅनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व शाळांच्या माध्यमातून पालकांचे व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. शैक्षणिक धडे देण्याचे काम सुरू असतानाच हर्सूल परिसरातील एका शाळेच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर खुद्द पालकाने अनेक अश्लील लिंक २० जून रोजी टाकल्या.
हा प्रकार काही पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या पालकाच्या मोबाईलवर अनेकदा संपर्क साधला. मात्र, त्याने मोबाईल बंद करून ठेवला होता. इतर पालकांनी या घटनेबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांना माहिती देत फैलावर घेतले. त्यानंतर ही लिंक काढून टाकण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी मुख्याध्यापकांनीही ‘त्या’ पालकाशी संपर्क केला. मात्र, त्या पालकाने मोबाईल बंद केला. यामुळे मुख्याध्यापक आणखीनच संतापले. त्यांनी थेट त्या पालकाचे घर गाठून त्याची खरडपट्टी केली. त्यानंतर व्हॉटस्अॅप ग्रुपवरील त्या लिंक काढून टाकण्यात आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांनी यासंदर्भात मंगळवारी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दाखल केला. याविषयी सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.