छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडीने काही जागांवरचे उमेदवार बदलल्यानंतर आता आणखी एक धक्का दिला आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी जाहीर केलेले उमेदवार अफसर खान यांना वंचितने एबी फॉर्म नाकारला आहे. यामुळे अफसर खान आता उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचार देखील सुरू केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, एबी फॉर्म नाकारत वंचितने अफसर खान यांना मोठा धक्का दिला आहे. उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काही ठिकाणी लागलीच उमेदवार बदल वंचितने केला आहे. त्यानंतर आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना थेट एबी फॉर्म नाकारत वंचितने उमेदवारास धक्का दिल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. अफसर खान आता लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहेत. उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
वंचित नवा उमेदवार देणार का?काही दिवसांपूर्वी एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर एमआयएमचे उमेदवार खासदार जलील यांच्या विरोधातील उमेदवारास एबी फॉर्म वंचितने नाकरला. यामुळे वंचित आता दूसरा उमेदवार देणार की एमआयएमच्या उमेदवारास पाठिंबा देणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वंचितने 'या' ठिकाणी बदलले उमेदवारराज्यात सर्वात प्रथम लोकसभेसाठी वंचितने उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर वंचितने काही ठिकाणी उमेदवार बदलले. रामटेक, वाशिम- यवतमाळ, परभणी, दिंडोरी येथे पक्षाने उमेदवार बदलले आहेत. तर आता औरंगाबादच्या उमेदवारास शेवटच्या क्षणी थेट 'एबी' फॉर्म नाकारत वंचितने पुन्हा एकदा नवीन राजकीय फासे टाकले आहेत.