औरंगाबाद: नवजात जुळ्या मुलींच्या उपचाराचे बील भरणे शक्य नसल्याने चिमुकल्या मुलींना रुग्णालयात सोडून तिची आईसह अन्य नातेवाईक पसार झाल्याची घटना हडकोत ३० आॅक्टोबर रोजी समोर आली. याविषयी माहिती मिळताच सिडको पोलिसांनी चिमुरडींच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयाचे बील भरण्यासाठी पैसे नसल्याचे आणि आधीच एक मुलगी असल्याचे कारण सांगून मोबाईल बंद केला.
जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात एका महिलेने २१ आॅक्टोबर रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींचे वजन कमी असल्याने त्याच दिवशी दोन्ही मुलींना हडकोतील निमाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी चिमुकलींच्या आई-वडिलांना पैसे भरण्याचे सांगितले. दोन दिवस ते भरतो असे म्हणाले आणि अचानक रुग्णालयातून पसार झाले. यानंतर तीन दिवस रुग्णालयाने मुलींच्या वडिलांशी संपर्क साधून तातडीने बिल भरण्याचे सांगितले. मात्र त्यांनी रुग्णालयास प्रतिसाद दिला नाही. ही बाब समजल्यानंतर रुग्णालयाने सिडको पोलीस ठाण्याला याविषयी कळविले. सिडको पोलिसांनी याबाबत बाल कल्याण समितीकडे आपला अहवाल पाठविला. समितीने दोन्ही मुलींना संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्र या अनाथालयाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. १ लाख ७० हजार रुपये भरा बाल कल्याण समितीचे आदेश घेऊन अनाथलयाचे कर्मचारी दोन्ही चिमुकलींना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांना १ लाख ७० हजार रुपयांचे बील जमा करण्याचे सांगितले. या मुलींवरील उपचाराचे बील भरल्यानंतरच त्यांना घेऊन जा असे बजावत मुलींना ताब्यात देण्यास नकार दिला. सिडको पोलिसांनी वडिलांशी साधला संपर्क पण.. दोन्ही मुलींना रुग्णालयात सोडून आई प्राची आणि वडिल मोहित भिकुलाल भंडारी (रा. सिल्लोड) हे पसार झाल्याचे समजल्यानंतर सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ जाधव यांनी मोहितशी संपर्क साधला तेव्हा त्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. शिवाय मोहितच्या सास-यांनीही जावई मोहित ऐकत नाही, त्यास आधीच एक मुलगी आहे, आम्ही काही करू शकत नसल्याचे नमूद करून मोबाईल फोन बंद केले.
आम्ही मुलींच्या उपचारावर खर्च केला दोन्ही मुलींचे वजन कमी असल्याने त्यांना आमच्या रुग्णालयातील अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले तेव्हापासून आम्ही त्यांच्यावर उपचार करीत आहोत.मुलींचे आई-वडिल त्यांना सोडून गेल्यानंतर त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्यावरील उपचारासाठी आम्ही खर्च केला. रुग्णालयाचे बील मिळावे, एवढीच अपेक्षा.- डॉ.संतोष मंदे्रवार, निमाई हॉस्पिटल.