औरंगाबाद : लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाने कृषी मालाची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्याचा गैरफायदा घेत टोमॅटोच्या कॅरेटआडून कर्नाटक राज्यातून ट्रकने आणलेला ९० लाखाचा गुटखा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडला. ही कारवाई झाल्टा फाट्याजवळ १४ मे रोजी रात्री उशीरा करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणाना अटक केली. सय्यद अकिल सय्यद अय्युब (३४,रा . सायकलपुरा, मलकापूर , जि . बुलढाणा) आणि शेख शफिक शेख कदीर (वय ३५, रा . पारपेठ , मलकापूर,बुलढाणा) अशी आरोपींची नावे आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, राज्यात गुटखाबंदी झाल्यानंतर पान टपरी आणि लहान मोठ्या किराणा दुकानात सहज गुटखा मिळतो . लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दुकाने बंद आहेत. मात्र चोरट्या मार्गाने आजही चढ्या दराने गुटखा विक्री केला जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कृषी मालाची वाहतूक करण्यासकेंद्र सरकारने परवानगी दिली . याचाच गैर फायदा घेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरच्या गुटखा तस्कराने टोमॅटोच्या कॅरेट खाली लपवून कर्नाटक राज्यातून ट्रकमधून गुटखा आणल्याची माहिती खबऱ्याने ग्रामीण पोलिसांना दिली. खबऱ्याने संशयित ट्रकची माहिती पोलिसांना दिल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील , अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक भागवत फुंदे , फौजदार संदीप सोळंके , कर्मचारीसय्यद झिया , गणेश मुळे , विक्रम देशमुख , दिपेश नागझरे , किरण गोरे , उमेश बकले , न्यानेश्वर धापसे ,प्रमोद साळवी आणि योगेश तरमळे यांच्या पथकाने १४ मे रोजी रात्री झाल्टा फाटा येथे सापळा रचून संशयित ट्रक पकडला.
ट्रकच्या झडतीत फुटले बिंग पोलिसांनी संशयित ट्रक ची झडती घेतली असता ट्रकमध्ये दर्शनी भागात एकावर एक अशी टोमॅटोची २२५ कॅरेट रचलेली दिसली . या कॅरेट खालील प्लास्टिक ताडपत्रीच्या खाली गुटख्याच्या तब्बल ३०० गोण्या लपविण्यात आल्याचे दिसले या गुटख्याची बाजारातील किम्मत ९० लाख रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक फुंदे यांनी सांगितले . हा गुटखा आणि ट्रक असा सुमारे १ कोटी ३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला . चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे