औरंगाबाद : हंगामात कापसाचे कमी उत्पन, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळलेल्या शेतक-याने सर्व कुटुंबच संपवण्याच्या निर्णय घेतला. सोमवारी सांयकाळी भाकरीच्या पिठात विष कालवून त्याने मात्र घर सोडले. विष मिश्रित भाकरी खाल्याने या शेतक-याच्या दोन मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी व दोन मुले गंभीर आहेत. हि धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील निंबायती-न्हावी तांडा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड हा पत्नी दोन मुली व दोन मुलांसोबत राहतो. त्याला ५ एकर शेती आहे. या हंगामात त्याने शेतात घेतलेल्या कापसाला योग्य उतारा मिळाला नाही. यामुळे त्यातून तुटपुंजे उत्पन्न मिळाले. पुढील हंगामात पिक घेण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नव्हते. तसेच त्याचे नाव कर्जमाफीच्या योजनेतही नव्हते. मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून राठोड याने संपूर्ण कुटुंबा संपण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्याने भाकरीच्या पिठात विष मिसळून ठेवले.
राठोड यांची पत्नी कावेरीबाई यांनी शेतातून घरी येऊन त्याच पिठाचा कुटुंबीयांसाठी स्वयंपाक केला. मात्र, संपूर्ण कुटुंब जेवायला बसले असताना राठोड न जेवताच बाहेर गेला. तो अद्यापही परतलेला नाही. रात्री दहानंतर कावेरीबाई (वय 32), मुलगी ज्योती (13) व गोगली (८), मुलगा राहुल (10) व दिनेश (10) यांना उलट्या होऊ लागल्या. उलट्या वाढत जाऊन त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मुलगी ज्योती व गोगली यांचा मृत्यू झाला. राहुल व दिनेश आणि कावेरीबाई राठोड या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान, राठोड यांचा अद्याप शोध लागला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.