वैजापूर (जि. औरंगाबाद) : दोन हरणांची शिकार करून पार्टीच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याचा वीरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात हरणांचे मांस जप्त करून गुलाब बाबासाहेब फुलारे, संजय बाबूराव त्रिभुवन (दोघे रा. हनुमंतगाव, ता. वैजापूर) या दोघांना अटक करण्यात आली. नानासाहेब सोपान कर्डे, सचिन अशोक त्रिभुवन आणि रवी एकनाथ त्रिभुवन हे तिघे आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली.
हनुमंतगाव परिसरात वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून, सध्या हरणांचा वावर वाढला आहे. या पाच जणांनी गुरुवारी दुपारी दोन हरणांची शिकार करून पार्टी करण्याचा वस्तीवर बेत आखला. पार्टीची तयारी सुरू असतानाच याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर ग्रामस्थ व पोलीस सतर्क झाले. वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश बोऱ्हाडे, पोलीस उपनिरीक्षक ए.जी. नागटिळक, हवालदार खंडू मोरे, दीपक बर्डे, गणेश जाधव यांच्या पथकाने तातडीने वस्तीवर धाव घेतली. त्यावेळी हे पाच जण पार्टीची तयारी करीत होते. पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला. पोलीस व ग्रामस्थांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना पकडले. मात्र, तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले, वनरक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी पंचनामा करून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस व वन विभागाची कारवाई सुरू होती.
तपासणीला पाठविणारपोलिसांनी घटनास्थळावरून हरणांचे मांस, हरणाला पकडण्यासाठी लावलेले जाळे, मटण शिजवण्यासाठी असलेले भांडे, दगडांची चूल, त्यात भाजलेल्या नख्या, कुऱ्हाड, सुरे, दारूच्या बाटल्या, हाडांचे तुकडे जप्त केले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.