औरंगाबाद: नातेवाईकांना भेटून पत्नीसह घरी जाणाऱ्या दुचाकीचालक रस्त्यावरील चुकीच्या गतिरोधकाने बळी घेतल्याची घटना बुधवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चिकलठाणा विमानतळ समोर झाली. या घटनेत मयताची पत्नी गंभीर जखमी झाले असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुरेश देविदास जाधव (४०, रा. आशा नगर,चिकलठाणा ) असे मयताचे नाव आहे. हे चिकलठाणा विमानतळ येथे खाजगी काम करायचे. काल रात्री ते पत्नी सीमा यांच्यासह मोंढा नाका परिसरातील नातेवाईकांच्या घरी भेटण्यासाठी गेले होते. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास जाधव पती पत्नी मोटारसायकलने घरी जात होते. विमानतळासमोरील न्यू हायस्कूलजवळ दोन महिन्यापूर्वी टाकलेले गतीरोधक त्यांना दिसले नाही. यामुळे गतीरोधकावर त्यांची दुचाकी जोराने आदळली आणि ते दुचाकीसह घसरून रस्त्यावर फेकल्या गेले. या घटनेत सुरेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि एका बाजूचा चेहरा चेपल्या गेल्याने त्यांच्या नाक, तोंड आणि कानातून रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध पडले. त्यांच्या पत्नीही यात गंभीर जखमी झाली.
यानंतर सुरेश यांना रुग्णवाहिकेतून एमजीएम रुग्णालयात तर त्यांच्या पत्नीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतांना सुरेश यांचा रात्री उशीरा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली. तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन समारंभकरीता पालकमंत्री येणार होते. पंपापासून जवळच असलेल्या जालना रोडवर हे गतीरोधक टाकण्यात आले होते. अत्यंत धोकादायक स्थितीतील हे गतीरोधक आहे. शिवाय वाहनचालकाना रात्रीच्या अंधारात ते दिसत नाही.