औरंगाबाद : सायकल खेळत असलेल्या पाच वर्षांच्या बालिकेला आमिष दाखवून १५ वर्षांच्या (विधिसंघर्षग्रस्त) मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेत बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता मुलास निरीक्षण गृहात पाठविण्यात आले.
पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय बालिका सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घरच्या परिसरात सायकल खेळत होती. परिसरातच राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने तिला आमिष दाखवत सायकलवर बसून घरापासून दूर अंतरावर नेले. तेथे पार्किंगमध्ये दोन वाहनांच्या आड घेऊन जात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर बालिकेला सोडून दिले. बालिका रडतच घरी आल्यामुळे आईवडिलांनी विचारपूस केल्यानंतर घटना उघडकीस आली.
बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक निरीक्षक एस.के. खटाणे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल मस्के, राजेंद्र साळुंके, रवी खरात, नाना पातारे, विजय निकम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्या मुलाने बालिकेला घेऊन जातानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केला. यानंतर त्याला मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला बाल न्यायमंडळ समोर सादर करण्यात आले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाणे करीत आहेत.