औरंगाबाद : गारखेडा परिसरातील भारत नगर येथे एका कुटुंबाला महावितरणकडून ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल आले. यामुळे रोज भाजीपाला विक्रीकरून घरखर्च भागवणारे कुटुंबप्रमुख जग्गनाथ शेळके हे तणावात आले आणि यातूनच त्यांनी आज पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जग्गनाथ शेळके हे गारखेडा परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. पत्नी व एका मुलासह ते भारत नगर येथे राहतात. त्यांचे येथे दोन खोल्याचे पत्र्याचे घर आहे. याच घरासाठी त्यांना महावितरणकडून या महिन्यासाठी ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल देण्यात आले. तसेच वीजबिल भरले नाही तर वीज खंडित करून तुमचे घर जप्त करण्यात येईल असे महावितरणकडून सांगण्यात आले. यामुळे प्रचंड तणावात आलेल्या शेळके यांनी आज पहाटे ४. ३० च्या दरम्यान आत्महत्या केली. यावेळी त्यांनी चिठ्ठीत, ' मला वीजबिल जास्त आल्याने जीवन संपवत आहे ' असे लिहिले आहे.
महावितरणवर गुन्हा दाखल करा दरम्यान, शेळके यांच्या नातेवाईकांनी महावितरणविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
रीडिंगमध्ये झाली चूक
शेळके यांचे काही दिवसांपूर्वी वीज मीटर बदलल्यात आले होते. यावेळी जुन्या मीटरमधील शेवटची रीडिंग नव्या मीटरमध्ये नोंद करताना चूक झाली. यामुळे त्यांना ३००० रुपयांचं बिल जाण्याऐवजी ८ लाख ६५ हजारांचं बिल देण्यात आल . या प्रकरणी महावितरणने बिलिंग लिपिक सुशील कोळी यांना निलंबित केले आहे अशी माहिती मिळत आहे.