औरंगाबाद: हनुमाननगरातील भरचौकात ८ ऑगस्टच्या रात्री आकाश रूपचंद राजपूत या तरूणाच्या हत्येचा थरकाप उडविणारा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी व्हायरल झाला. अत्यंत क्रूरतेने मारेकऱ्यांनी आकाशची लाकडी दांड्याने आणि धारदार शस्त्राने ठेचून हत्या केल्याचे त्यात दिसते. गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या आकाशवर एक मारेकरी लघूशंका करीत असल्याचे या या व्हिडिओ क्लीपमध्ये दिसते. हत्येच्या या व्हिडिओ क्लीपमुळे शहरात खळबळ उडाली.
किरकोळ वादातून ८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास आकाश राजपूत याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी मारेकरी गणेश रविंद्र तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, संदीप त्रिंबक जाधव, राहुल युवराज पवार आणि मंगल रविंद्र तनपुरे यांना अटक केली. ही संपूर्ण घटना कुणीतरी त्याच्या मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ मंगळवारी समाजमाध्यमावर व्हारयल झाला. अंगावर काटा आणणारी आणि हृदयाचा थरकाप उडविणारा ही व्हिडिओ क्लीप कोणी मोबाइलवर तयार केली, हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांच्या मते हा व्हिडिओ आरोपींपैकीच कुणीतरी तयार केला असू शकतो. याविषयी पोलीस तपास करीत आहेत.
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढआकाशच्या मारेकऱ्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. समाजमाध्यमावर व्हायरल झालेला व्हिडिओ कोणी तयार केला. त्यातील आवाज आरोपींचा असण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे व या व्हिडिओ क्लीपविषयी चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी वाढविल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.