औरंगाबाद : पिसादेवी गावाच्या पुलाखाली तरुणाचा आढळलेला मृतदेह रामचंद्र रमेश जायभाये (रा. कुंभेफळ, जि. बुलडाणा, ह. मु. आईसाहेबनगर, पिसादेवी रोड, हर्सूल) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा काटा काढला असल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
चिकलठाणा पोलीस ठाण्यात मृताचे भाऊ कृष्णा जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रामचंद्र हे खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करीत होते. ते औरंगाबादला आईसाहेबनगर येथे सासू हिराबाई घुगे यांच्या इमारतीमध्ये पत्नी मनीषा व दोन वर्षांचा मुलगा अथर्व यांच्यासह राहात होते. रामचंद्रच्या पत्नीचे त्यांचा मित्र गणेश रघुनाथ फरकाडे (रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे रामचंद्र यांस दारूचे व्यसन लागले होते. या संबंधात अडसर ठरत असल्यामुळेच रामचंद्र यांचा खून मनीषा व तिचा प्रियकर गणेश या दोघांनी काढला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या दोघांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा गुुरुवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. दरम्यान, पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना कळविले. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन जाधव यांनी सहकाऱ्यांसह मृतदेह ताब्यात घेतला असता, मृताच्या खिशात आधारकार्ड आढळले. ही माहिती मृताच्या भावाला देण्यात आल्यानंतर कुंभेफळ येथून ते आल्यानंतर मृताची ओळख पटली. अधिक तपास फौजदार ढगारे करीत आहेत. मृत रामचंद्र यांच्या मानेवर मोठी जखम आहे. तसेच गळ्यावर अनेक जखमा दिसून आल्या.
‘ती’ भेट शेवटची ठरलीरामचंद्र यांचे आई-वडील व भाऊ कृष्णा हे तिघे बुधवारी उपचारासाठी घाटीत आले होते. तेव्हा रामचंद्र तिघांना भेटले होते. ही भेट शेवटचीच ठरली असल्याचे सांगून भाऊ कृष्णा यांनी हंबरडा फोडला. तसेच भावजयीने भावाचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
दोन वर्षांच्या चिमुकल्याचे काय?मृत रामचंद्र व मनीषा या दाम्पत्यास दोन वर्षांचा अथर्व हा मुलगा आहे. त्याच्या वडिलांचा खून झाला असून, आईच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या मुलावर अनाथ होण्याची वेळ आली आहे.