औरंगाबाद : जालन्याहून औरंगाबादला बसने प्रवास करीत असताना सहप्रवाशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने पंचायत समिती सदस्य तरुणीची छेड काढल्याचा प्रकार २३ नोव्हेबर रोजी रात्री १२ वाजता घडला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
सचिन सुधाकरराव महाजन (४७, रा. मोरया पार्क, टीव्ही सेंटर) असे आरोपी जि. प. शिक्षकाचे नाव आहे. दाखल फिर्यादीनुसार; पीडित तरुणी बीड जिल्ह्यातील एका पंचायत समितीची सदस्य आहे. २३ नोव्हेंबरला कामानिमित्त ती चनेगाव (ता. बदनापूर) येथे गेली होती. तेथील काम आटोपल्यानंतर रात्री ११.४५ वाजता जालना बसस्थानकावर आली. औरंगाबादमार्गे पुण्याला जाणाऱ्या शिवशाहीत बसली. त्यावेळी आरोपी शिक्षक सचिन महाजन हा बसजवळच उभा होता. चालकाने बस सुरू केल्यावर तो बसमध्ये चढला. तो पीडितेजवळच्या सीटवर बसू लागला. तेव्हा पीडितेने त्याला तेथे बसू न देता, पूर्ण बस रिकामी आहे. तुम्ही मागे बसा, असे सुचविले. त्यानंतर महाजन हा पाठीमागील सीटवर बसला.
बस पुढे आल्यावर पीडितेने वाहकाकडून तिकीट घेतले. तेव्हा, थंडीचा त्रास होत आहे. एसी कमी राहू द्या, अशी विनंती केली. तेव्हा महाजनने एसी चालू-बंद करण्याचा प्रयत्न करून पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळात पीडितेला झोप लागली. तेव्हा सिटाच्या फटीतून महाजनने पीडितेचा विनयभंग केला. मध्यरात्री १२.४५ वाजता बस सिडको बसस्थानकात आली. तत्पूर्वीच पीडितेने वडिलांना बोलावून घेतले होते. ती बसमधून उतरताच वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण एमआयडीसी सिडको ठाण्यात गेले. पीडितेने तक्रार दिली. त्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
११२ वरून पोलिस बोलावलेघडलेल्या प्रकारामुळे संतापलेल्या तरुणीने सिडको बसस्थानकात उतरताच ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. पोलिस आल्यानंतर त्यांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने नाव सांगितले. तोपर्यंत आरोपी व पीडितेला एकमेकांचे नावही माहिती नव्हते. अधिक तपास उपनिरीक्षक प्रतिभा आबुज करीत आहेत.