सिल्लोड : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे, चारही माजी आमदारांच्या गावात धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पत्नीचा अंधारी ग्रामपंचायत निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांच्या पॅनलचे १७ पैकी केवळ ७ उमेदवार निवडून आले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचितचे दादाराव वानखेडे, भाजपचे पं.स.चे माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे यांच्या पॅनलचे १० उमेदवार निवडून आले आहेत. भराडीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यापासून लांब झालेले माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, गजानन महाजन व भाजपचे राजेंद्र जैस्वाल यांच्या संयुक्त पॅनलने १५ पैकी ८ उमेदवार निवडून आले. अब्दुल सत्तार यांचे समर्थक अनिस पठाण यांचे सात उमेदवार निवडून आले. तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या अजिंठा, अंधारी, भवन या तीन ग्रामपंचायतींच्या निकालाने प्रस्थापितांना धक्का बसला. घाटनांद्रा, शिवना व डोंगरगाव या तीन ग्रामपंचायतीत मतदारांनी विद्यमान गाव कारभाऱ्यांवर विश्वास टाकला.
या दिग्गजांना बसला धक्का
तालुक्यातील शिवना जि.प. सदस्य गजानन राऊत, अंधारी जि.प. सदस्य केशवराव तायडे, पालोद येथील मीनाताई गायकवाड यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतची सत्ता गमावली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील पॅनलला मतदारांनी नाकारून भविष्यासाठी त्यांना धोक्याची घंटा दिली आहे. माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जि.प. सदस्या सीमाताई गव्हाणे, जि.प. सदस्या सरलाताई बनकर, जि.प.सदस्या शिल्पाताई गरुड या सदस्यांच्या पॅनलला मतदारांनी पुन्हा सत्तेत ठेवले.
चौकट
चार माजी आमदारांच्या गावात धक्कादायक निकाल
माजी आ. सांडू पाटील लोखंडे यांंनी मांडणा येथे सत्तासूत्रे हाती घेतली आहे. माजी मंत्री कै.दादासाहेब पालोदकर यांचे सुपुत्र रामदास पालोदकर यांच्या पॅनलला पालोद वासियांनी नाकारले आहे. माजी आ. कै.किसनराव काळे यांचे सुपुत्र मधुकर काळे हे शिवना ग्रामपंचायतमध्ये निवडून आले आहे. मात्र, पॅनल सत्तेपासून दूर आहे. मा.आ.गंगाराम मानकर यांचे सुपुत्र माजी जि.प. उपाध्यक्ष सुभाषराव मानकर यांच्या मुलाला पानवडोद ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले असून, त्यांच्या पॅनलला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.
चौकट
ईश्वर चिठ्ठीतून मिळाला विजय
ग्रामपंचायत वरुड खुर्द येथील प्रभाग क्र. ३ मध्ये आनंदा गाडेकर व अंकुश मिरगे यांना समसमान २१८ मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली, त्यात आनंदा गाडेकर हे विजयी झाले.