छत्रपती संभाजीनगर : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘माईल स्टोन’ ठरलेला, एक अजरामर कलाकृती ‘शोले’ चित्रपट यंदा पन्नाशीमध्ये पोहोचला आहे. या १५ ऑगस्टपासून सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी ऐन तरुणाईत असलेले सिनेरसिक आज सत्तरीत येऊन पोहोचले आहेत. त्यांनी त्या काळात ‘शोले’ चित्रपट नुसता पाहिला नाही तर त्यातील अनेक जण पात्रांसारखे जगले. होय, छत्रपती संभाजीनगरातही कोणी ‘गब्बर’ म्हणून जगले, चित्रपटाची गाणी, नृत्य काहींच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. एवढेच नव्हे तर काहींचे लग्न लावून देण्यातही या ‘शोले’ने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘बहुत याराना लगता है’... ‘अब तेरा क्या होगा कालिया’ हे डायलॉग तर आजही अनेकांच्या तोंडात रेंगाळत आहेत. हीच या चित्रपटाची खासियत ठरली.
७० एमएमचा चित्रपट ३५ एमएम मध्येहिंदी चित्रपटसृष्टीतील बिग स्टारकास्ट घेऊन ‘शोले’ चित्रपट बनविण्यात आला. मुंबई, हैद्राबाद येथील चित्रपटगृहात १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी ७० एमएमच्या पडद्यावर झळकला होता. छत्रपती संभाजीनगरात शहागंजातील स्टेट टॉकीज, सराफा बाजारातील मोहन टॉकीजमध्ये सिनेरसिकांनी ३५ एमएमच्या पडद्यावर चित्रपट पाहिला. तेव्हा ७० एमएमच्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी काही जण मुंबई व हैद्राबादमध्ये गेले होते, हे विशेष.
गब्बर एवढा आवडला की, तो अंगातच भिन्नलाशहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहन बोंबले हे दिसायला गब्बर (अमजद खान) सारखे. त्यांनी शोले पाहून गब्बर सारखीच वेशभूषा केली होती. तशीच केशरचना, दाढी एवढेच नव्हे तर गब्बरने परिधान केलेल्या कपड्यासारखेच ५ ते ६ ड्रेस शिवून घेतले होते. त्यांना अनेक जण प्रेमाने ‘अमजद खान’ कोणी ‘गब्बर’ म्हणून हाका मारत होते. ‘बहुत याराना लगता है’... अब तेरा क्या होगा कालिया’ हे डायलॉग त्यांच्याकडून लोक म्हणून घेत होते. मोहन बोंबले यांनी सांगितले की, १९८२ पर्यंत ते ‘गब्बर’ची वेशभूषा करीत होते.
‘मेहबूबा’ गाण्याने अडकले लग्नाच्या बेडीतज्येष्ठ सिनेरसिक जगन्नाथ बसैये बंधू हे १९७५-७६ ला २१ वर्षांचे होते. त्यांनी स्टेट टॉकीजमध्ये ‘शोले’ पाहिला. त्यांना ‘ये दोस्ती, हम नहीं तोडेंगे’ हे गीत खूप आवडले व त्यांनी तेव्हा रेडिओ सिलोनवर या गाण्यासाठी ‘फोन फर्माइश’ पाठविली. मात्र, रेडिओवर निवेदकांनी जगन्नाथ बसैये बंधू गुलमंडी इनकी फर्माइश ‘मेहबूबा मेहबूबा... गुलशन में गुल खिलते है’ हे गीत लावले. ते ऐकून त्यांचे मोठे बंधू शालीग्राम बसैये खूप चिडले. त्यांनी वडिलांच्या कानावरही फोन फर्माइशची माहिती घातली. मुलगा वाया चालला असे म्हणत वडिलांनीही संताप व्यक्त करीत दोन महिन्यात जगन्नाथ यांना ‘लग्नाच्या बेडीत’ अडकविले. शोले सिनेमामुळे माझे लग्न लागले, अशी आठवण ते आज सांगतात.
बँड पथकातील कलाकारांनी कमविले पैसेजानिमियाँ ब्रास बँडचे मालक सय्यद अजम यांनी सांगितले की, शोले चित्रपटाची गाणी त्याकाळी लग्नाच्या वरातीमध्ये खूप वाजविण्यात आली. त्यांच्याकडे नारळीबाग येथे राहणारा ‘ठाकूर’ नावाचा कलाकार होता. ते थाळी नृत्य करीत असत. वरातीमध्ये खाली काचा पसरवरून ‘जब तक है जान जाने जहा मैं नाचूंगी’ या गीतावर थाळी नृत्य लोकप्रिय झाले होते.
जय-विरुची साइड कार बाईकज्येष्ठ नागरिक सुरेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले की, १९७५ मध्ये चौहान बंधूंनी शोलेतील जय-विरुची लोकप्रिय ठरलेली बाईक आणि साईड कार सारखी बाईक खरेदी केली. ही साईडकार असलेली बाईक ’बीएसए १९४२’चे मॉडेल आहे. त्यावेळेस आमच्याकडील बाईक शहरात लोकप्रिय ठरली होती. आजही ती बाईक त्यांनी जपून ठेवली आहे.