खुलताबाद : तालुक्यातील सोनखेडा येथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे निष्कृष्ट इमारत बांधकामाची चौकशी जिल्हाप्रशासनामार्फत व्हावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्यासाठी जि.प.सदस्य प्रा.सुरेश सोनवणे, सरपंच ललिता सोनवणे यांच्यासह सदस्यांनी आरोग्य उपकेंद्राच्या छतावर बसून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे सन 2008 मध्ये 20 लाख रूपये खर्चाचे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याबद्दल आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. मात्र यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे हे बांधकाम पाडून या ठिकाणी त्वरीत नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन त्याचे काम सुरू करावे. सबंधित अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच ललिता सुरेश सोनवणे , उपसरपंच लताबाई वाकळे, सदस्य नवनाथ ठिल्लारे, मनोज सोनवणे, शेख शबाना, योगीता ठिल्लारे , राजेंद्र कसारे यांनी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत जिप. सदस्य प्रा. सुरेश सोनवणे म्हणाले की, आरोग्य उपकेंद्राचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोग्य विभागास 15 व 18 जानेवारी 2019 ला पत्राद्वारे कळविले होते. तसेच जि.प. सर्वसाधारण सभेत वारंवार सोनखेडा आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थीत केलेला आहे. तरी ही आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याने आंदोलन करावे लागत आहे.