औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चाच्या विविध मागण्यांसाठी छावा श्रमिक संघटनेतर्फे शनिवारी सकाळी पुंडलिकनगर जलकुंभावर चढुन शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आतापर्यंत विविध आंदोलने झाली. ४२ तरुणांनी आत्मबलिदान दिले, सुमारे १ हजार ३०० आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. एवढ्या प्रयत्नानंतर प्राप्त आरक्षणाला ९ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तेव्हापासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करीत आहेत. शनिवारी शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर चढून छावा श्रमिकअसंघटनेने शोले स्टाईल आंदोलन करून लक्ष वेधले.
मराठा आरक्षणाची स्थगिती उठवावी, मराठा आरक्षण लढ्यात आत्मबलिदान देणाऱ्या तरुणांच्या वारसाला त्वरित १० लाख रुपये आणि नोकरी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होतेे. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरिक्षक मीरा चव्हाण आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आंदोलकांना विनंती करून खाली उतरविले. आंदोलक जलकुंभावरुन उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या. ज्ञानेश्वर गायकवाड, शैलेश भिसे, ज्ञानेश्वर घारे , दगडू शिंगटे, संजय नलावडे आणि किशोर जाधव आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजताच आमदार अतुल सावे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. मराठा समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडून सरकारकडून मागण्या मान्य करून घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.