औरंगाबाद : किरकोळ कारणावरून दोन भावांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून एकाला जखमी करणारा मुख्य आरोपी दोन दिवसांनंतर पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे. गुन्हे शाखा आणि सिटीचौक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बुढीलेन येथे २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता भंगार व्यावसायिक महेमूद शेख अहेमद जमील ऊर्फ राजाभाई भंगारवाला याच्याशी रस्त्यात गाडी उभी केल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादात राजाभाईच्या सांगण्यावरून त्याचा वाहनचालक आरोपी अक्रम खानने जब्बारचा भाऊ रज्जाकवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी चुकविल्यामुळे रज्जाक वाचला होता. यानंतर आरोपी तेथून पळून गेला आणि परत १० वाजता आला. त्याचवेळी जब्बार आरोपी राजाभाईला याविषयी जाब विचारत होता. याचा राग आल्याने आरोपी अक्रमने जब्बारवर गोळीबार केला. यात जब्बार गंभीर जखमी झाला. तेव्हापासून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. जब्बारच्या तक्रारीनंतर आरोपी राजाभाई भंगारवाला याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी अक्रमला पळवून लावणारा राजाभाई मात्र तपासात पोलिसांना सहकार्य करीत नाही. अक्रमकडे गावठी कट्टा असल्याची माहिती असूनही त्याने त्याला पाठीशी घातले. यामुळेच आरोपीचे गोळीबार करण्याचे धाडस वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. पळून गेलेला आरोपी अक्रम हा हर्सूल परिसरातील जहागीर कॉलनीतील रहिवासी आहेत. त्याचा शोध गुन्हे शाखा आणि सिटीचौक पोलीस घेत आहेत. मात्र, घटनेला दोन दिवस उलटत असताना आरोपी अक्रम पोलिसांच्या हाती लागला नाही.