सिल्लोड: तालुक्यातील जळकी येथील किराणा दुकानदाराच्या घराला आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात घरातील कपाटात एका डब्यात ठेवलेली चार लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, किराणा माल, दागिने, रोकड आणि जीवनावश्यक वस्तू जळून एकूण १० लाखांचे नुकसान झाले आहे.
हानिफ सत्तार शहा हे किराणा दुकानदार आहे. त्यांच्या घरातच किराणा दुकान आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमाराला घरात अचानक आग लागली. माहिती मिळताच गावतील डॉ.शकील शहा, राहुल बदर, इरफान शहा, सुभाष पाटील, अफसर शहा आदी ग्रामस्थांनी धाव घेऊन पाण्याचे टँकर मागवत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण घर कवेत घेतले.
आगीत घरातील कपाटात ठेवलेली चार लाखांची रोकड, जवळपास २ लाखांचे किराणा सामान सुद्धा जळून खाक झाले. या आगीचे नेमके कारण जमजले नसले तरी ही आग शॉट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हानिफ सत्तार शहा यांनी केली आहे. घटनेचा पंचनामा तलाठी जी. आर.घोडके यांनी केला. त्यात चार लाख रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने व जीवनावश्यक सामान असे १० लाखांचे नुकसान झाले आहे.